अकोल्यासह वाशीम बुलढाण्यात संततधार पाऊस, नदी-नाल्यांना पूर,अनेक गावांचा संपर्क तुटला

अकोला : १८ जुलै – पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी मुसळधार तर कुठे रिमझिम पाऊस झाल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पश्चिम वऱ्हाडात दोन दिवसांची उसंत घेतल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली. रविवारी सायंकाळपासून पाऊस सुरू आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ३५.९ मि. मी. पावसाची नोंद झाली. बाळापूर तालुक्यात सर्वाधिक ६०.७ मि.मी. पाऊस पडला, याशिवाय पातूर ५१.४, तेल्हारा ४४.४, अकोला ३७.६, मूर्तिजापूर २८.९, बार्शीटाकळी २९ मि.मी. तर सर्वात कमी अकोट तालुक्यात ७.८ मि.मी. पाऊस झाला. पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे बाळापूरमध्ये वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले. अनेक फिडरवरील वीज पुरवठा बंद आहे. मन, महेश, निर्गुणा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. नदीकाठच्या घराला पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. बाळापूर धरणातून पाणी सोडण्यात येत असले तरी मनारखेड धरणाची दारे उघडली असल्यामुळे बाळापूर शहरातील मन नदीच्या पाण्याची पातळी खाली गेलेली आहे.
आज सकाळी ९ वाजता वान प्रकल्पाची पाणी पातळी ४०३.६७ मीटर नोंदविली गेली असून ५९.५० टक्के पाणीसाठा झाला आहे. वान प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन सूचीनुसार प्रकल्पामध्ये जुलैअखेर ६१.४४ टक्के पाणीसाठा असणे निर्धारित आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून सुरक्षेच्या दृष्टीने येत्या २४ तासात वक्रद्वार प्रचलित करून पुराचे पाणी नदीपात्रामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध रहावे, नदी पात्र ओलांडू नये, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात जास्त पाऊस झाल्यामुळे व धरणातील पाणी सोडल्यामुळे पूर्णा नदीची पाण्याची पातळी वाढणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा रात्रभर मुसळधार पाऊस झाला. शेगाव तालुक्यातील कालखेड गावाला पुराचा वेढा आहे. शेगाव, खामगाव, संग्रामपूर, नांदुरा आदींसह बहुतांश तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पुरामुळे शेगाव-संग्रामपूर-बुऱ्हाणपूर मार्ग बंद पडला. रुग्णवाहिकेसह अनेक वाहने अडकून पडले आहेत. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. वाशीम जिल्ह्यातही सर्वदूर पाऊस पडत आहे.

Leave a Reply