अकोल्यातील आपत्कालीन बचाव व शोध पथकाने जिवाची बाजी लावून दिले बुडणाऱ्या भावंडांना जीवदान

अकोला : १३ जुलै – पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत बुडणाऱ्या भावंडांना अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव व शोध पथकाने जिवाची बाजी लावून जीवदान दिले. अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून त्या भावांना बचाव पथकाने वाचवले.
चंद्रभागा नदीपात्रात मुंबई येथील जितेंद्र अजयकुमार कहाळ आणि अभिजीत अजयकुमार कहाळ हे दोघे भाऊ पाण्यात पोहत असताना अचानक बुडायला लागले. हे पाहताच संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाच्या जवानांनी तातडीने ‘रेस्क्यू बोट’ त्यांच्याकडे वळवली. पथकातील सदस्यांनी पाण्यात उडी घेऊन त्या दोघांना वाचवले. दोघेही पाण्यात बुडत असताना जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांना पाण्याबाहेर येता आले नाही. आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांच्या जवानांनी जीवाची बाजी लावत या दोन तरुणांचा सुखरूप वाचवले. बचाव पथकाच्या शौर्याचे जिल्हा प्रशासन व वाऱ्याकऱ्यांनी कौतुक केले.
आषाढी एकादशीपासून अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील आपत्कालीन बचाव व शोध पथक पंढरपूर येथे कार्यरत आहे. या पथकातील जवानांनी आतापर्यंत पाण्यात बुडणाऱ्या पाच लोकांना वाचवले आहे.

Leave a Reply