प्रवासी जीप नाल्यात वाहून गेल्याने ६ जणांचा मृत्यू , तिघांचे मृतदेह सापडले

नागपूर : १३ जुलै – नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नांदा गावाजवळ एक प्रवासी जीप नाल्याच्या पुरात वाहून गेली. त्यात सहा प्रवासी होते. सायंकाळपर्यंत तिघांचे मृतदेह सापडले होते. उर्वरितांचा शोध सुरू आहे.सापडलेल्या मृतदेहांमध्ये एक महिला,एक पुरूष व एका लहान मुलाचा समावेश आहे.
ग्रामीण पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आली आहे.अनेक नद्या-नाल्यांना पूर आला आहे. मंगळवारी सावनेर तालुक्यातील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदा येथील एका नाल्याच्या पुरात प्रवासी जीप वाहून गेली.त्यात सहा प्रवासी होते.पुलावरून पाणी वाहत असताना चालकाने पाण्यातून जीप पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पाण्याच्या प्रवाहात जीप वाहून गेली. बचाव पथक घटनास्थळी गेले आहे.
या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली असून मृताच्या कुटुंबीयांना ४ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “नागपूर जिल्ह्यातील नांदागोमुख छत्रापूर येथील पुलावरुन एक वाहन कोसळल्याने वाहनातील सहा जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. या घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे ऐकून दु:ख झालं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे युद्धपातळीवर केला जात असून एनडीआरएफची सुद्धा मदत घेतली जात आहे. नागपूर जिल्हाधिकार्यांशी मी संपर्कात आहे. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल.”

Leave a Reply