पहिले दोन लग्न लपवत नराधमाने केले तिसरे लग्न, गुन्हा दाखल

नागपूर : १३ जुलै – पहिले दोन लग्न लपवत त्या नराधमाने एका २३ वर्षीय मुलीशी तिसऱ्यांदा लग्न केले. या मुलीला त्याच्या आधीच्या दोन लग्नाची कुणकुणही लागू दिली नाही. त्यानंतर त्यांना मुलगी झाली. आता पती हा स्वत:च्याच तीन वर्षाच्या मुलीच्या जीवाच्या मागे लागला. मुलीला जिवंत गाडण्याची धमकीच त्याने दिली. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राहुल भालेकर (वय ३१) असे आरोपी पतीचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, जरीपटक्यात वास्तव्याला असणार्या मुलीचे आरोपी राहुल भालेकर (रा. मनीषनगर) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, यापूर्वीच आरोपीचे दोन लग्न झाले होते. ही माहिती राहुलने तिच्यापासून लपवली होती. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्यातील जात आडवी आली. यावरून मुलीच्या घरच्यांकडून लग्नास विरोध होता. परंतु, तिने घरच्यांचे न ऐकता राहुलसोबत २0१७ मध्ये कोराडी येथे लग्नगाठ बांधली. लग्नाचे सुरुवातीचे दिवस अगदी स्वप्नवत गेले. परंतु, जेव्हा राहुलच्या दोन लग्नाची माहिती तिला कळाली तेव्हा तिच्या पायाखालची वाळूच सरकली. याबाबत जेव्हा ती राहुलला विचारणा करीत होती तेव्हा तो तिला मारझोड करीत होता. जीवनाचा असाच प्रवास सुरू असतानाच २0१९ मध्ये तिला मुलगी झाली. तिने सर्व गोष्टी मागे टाकल्या आणि मुलीच्या भविष्यासाठी ती राहुलचा छळ सहन करीत त्याच्याच घरी रहायला लागली. राहुल हा दारू पिऊन यायचा आणि तिला मारहाण करायचा. अखेर ती राहुलच्या छळाला कंटाळली आणि डिसेंबर २0२१ मध्ये माहेरी परतली. येथेही आरोपीचा त्रास सुरू होताच. ११ जुलै राहुल हा सकाळी तिच्या माहेरी पोहोचला. येथे त्याने शिवीगाळ करत पत्नीला व तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. यातून ती महिला आणखीच हादरली. परिणामी तिने जरीपटका पोलिसात पोहोचून राहुलविरुद्घ तक्रार दाखल केली.

Leave a Reply