संपादकीय संवाद – स्वदेशी बनावटीच्या आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचे स्वागत व्हायलाच हवे

आयएनएस विक्रांत ही नवी विमानवाहू युद्धनौका लवकरच भारतीय नौदलात सहभागी होत असून येत्या स्वातंत्र्यदिनाला ही युद्धनौका आपली प्रात्यक्षिके समुद्रात दाखवणार असल्याची बातमी आहे,. विशेष म्हणजे ही पूर्णतः भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आहे. ही बाब लक्षात घेता या युद्धनौकेचे स्वागत व्हायला हवे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर लष्करात तसेच वायुदल आणि नौदलात सर्व विदेशी बनावटीचे शस्त्रास्त्र आणि साधनसामुग्री वापरली जात होती. मात्र गेल्या काही वर्षांत देशाने सर्वच बाबतीत स्वदेशी तंत्रज्ञान वापरून स्वयंपूर्ण होण्याचा निर्णय घेतला. आणि त्याची अंमलबजावणीही सुरु झाली. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यावर त्यांनी जसे संरक्षण सज्जतेकडे लक्ष पुरवले तसेच साडेसहा बनावटीची साधनसामुग्री निर्माण करण्यावरही भर दिला. त्याचेच परिणामस्वरूप ही संपूर्णतः भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका नौदलात दाखल झाली आहे. या नौकेवरून एकावेळी ३० विमाने उड्डाण करू शकणार आहेत. म्हणजे एका सुसज्ज विमानतळाचे हे तरंगते स्वरूप आहे, एका टप्प्यात ही युद्धनौका १५००० किलोमीटरचा प्रवास करू शकणार आहे. यावरून या नौकेचे वैशिष्ठ लक्षात यावे.
भारताला जागतिक महासत्ता बनायचे असेल तर सर्वप्रथम संरक्षण सज्ज व्हायला हवे. आपले शेजारी शत्रू अनेक आहेत, त्यांच्यावर वचक निर्माण केला, तरच आपण पुढे जाऊ शकू. मोदी सरकारने शेजाऱ्यांवर वचक निर्माण करायला सुरुवात केली आहे. आयएनएस विक्रांत हे त्यातील पुढचे पाऊल आहे. त्यामुळे त्याचे स्वागत व्हायलाच हवे.

अविनाश पाठक

Leave a Reply