नामांतराचे दु:ख – विनोद देशमुख

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे नामांतर, जाता जाता का होईना, आम्ही करून दाखविले, असे नाटक शिवसेनेच्या ठाकरे गटाने वठविले खरे. पण, मविआचे त्यांचे मित्रपक्ष मात्र त्याच नामांतरासाठी आता रडगाणे गाऊ लागले आहेत ! काॅंग्रेस हायकमांडने याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलेली असतानाच, आता राष्ट्रवादीनेही हात झटकले आहेत. त्यामुळे या नामांतरावरून ठाकरे गट एकटा पडत चालला आहे. नव्हे, त्याला एकटे पाडून संपवण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याची शंका यातून आणखी गडद होत आहे.
शरद पवार यांनी औरंगाबादच्या पत्रपरिषदेत नामांतरासंदर्भात जे वक्तव्य केले, ते पाहून कोणीही हेच म्हणेल की, हा तर ठाकरेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न ! “नामांतराचा मुद्दा मविआच्या किमान समान कार्यक्रमात नव्हता. मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत हा विषय आणण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षाशी संवाद साधला नव्हता. निर्णय झाल्यानंतरच आम्हाला कळले. इतर अनेक विषय नामांतरापेक्षा महत्त्वाचे होते” असे पवारांनी सांगितले. व्होटबॅंक जपण्यासाठी काय करावे लागते, हे पवारांकडून शिकावे ! मुख्यमंत्रिपदाच्या नादात उद्धव ठाकरे हा धडा विसरले आणि चहूबाजूंनी अडचणीत आले. आता शिवसेना शिंदे गट, भाजपा, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी अशा चौघांनी त्यांना घेरलेले आहे. याला प्रामुख्याने कारणीभूत आहेत शरद पवार !
उद्धव ठाकरेंच्या मनात असलेले शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (हे संजय राऊतांनी जाहीरपणे सांगितले आहे आणि ते फक्त खरेच बोलत असतात !) 2019 मध्येच त्या पदावर विराजमान झाले असते तर, आजचे महाभारत घडलेच नसते. परंतु, पवारांनी गळ घालून ठाकरेंना मुख्यमंत्री बनविले आणि शिवसेनेचा ऱ्हास सुरू झाला. सरकारची सूत्रे स्वत:च्या हातात ठेवून पवारांनी सेनेतील धुसफुस वाढविली अन् दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदावरून काॅंग्रेसचीही गोची केली. शिंदेंच्या बंडानंतर राजीनामा देण्याच्या मनःस्थितीत आलेल्या ठाकरेंना राजीनामा देण्यापासून रोखले आणि शेवटी तोंडघशी पाडले. आता तर नामांतरावरून अप्रत्यक्ष कानउघाडणीच केली आहे. हे सारे लोकांना स्वच्छ दिसत आहे. मग, ठाकरेंना दिसले नाही का ?
आठवडाभर नामांतरावर काही न बोललेले पवार बरोबर बकरी ईदच्या दिवशी मुद्दाम औरंगाबाद येथे येऊन बोलतात, हे नियोजन लक्षात घेण्यासारखे आहे. वर, भविष्यातील निवडणूक महा विकास आघाडीत एकत्र लढविण्याचे गाजरही त्यांनी दाखविले आहे. याचा अर्थ, शिवसेनेला संपवण्याचा डावच त्यांनी मांडला आहे. भाजपा आणि शिंदे गटाने त्यात खोडा घातला, हा भाग वेगळा. परंतु, या सर्वात ठाकरेंना काय मिळाले (अडीच वर्षे नावाचेच मुख्यमंत्रिपद सोडून) हा खरा प्रश्न आहे. सेक्युलर मित्रांमुळे प्रतिमा खराब, शिवसैनिक नाराज, मोठा उठाव, पद जाणे असे परिणाम होऊन पक्ष खिळखिळा झाला. याचसाठी केला होता का भाजपाशी काडीमोड घेण्याचा अट्टहास !
शरद पवार हे राजकारणातील पक्के खेळाडू आहेत. महाराष्ट्रातील पहिले राजकीय बंड त्यांनीच 44 वर्षांपूर्वी घडविले. शिवसेनेला सुरुंग लावण्याचे कामही त्यांनी वेळोवेळी केले. तरीही त्यांच्याशी हातमिळवणी करणे हा आत्मघात ठरू शकतो, ही गोष्ट एकाही ‘बडव्या’च्या लक्षात येऊ नये ? की, तेच फितुर झाले ? भाजपावरील राग काढताना तथाकथित ठाकरी बाणा जपला गेला असता तर आजची वेळ आली नसती. लोकशाहीत हे सारे भान ठेवावे लागते. पण, राज्योराज्यात असलेले घराणेशाहीचे पाईक येथेच फसतात, असाच अनुभव आहे. इतरांना पुढे करून नंतर त्यांची फजिती करायची (सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री प्रकरण) हा पवारांचा जुनाच खेळ आहे. त्यापासून सावध राहण्याऐवजी तुम्ही त्यांच्याच आहारी जाणार असाल तर मग देव तुमचे भले करो !

विनोद देशमुख

Leave a Reply