अपहारकर्त्यावर कारवाई होत नसल्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न

अकोला : १२ मे – अकोला जिल्ह्यातील पातूर पंचायत समिती येथील सचिव पी.पी. चव्हाण हे अपहार करत असून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप करत सायवणी येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ताले यांनी आज पातूर पंचायत समितीच्या आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे.
पातूर तालुक्यातील सावरगाव झरंडी ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये अपहार झाला आहे. मात्र तरीही चौकशी करण्यास संबंधितांकडून टाळाटाळ केली जात आहे, असा सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ताले यांचा आरोप आहे. याप्रकरणी वेळोवेळी मागणी करूनही चौकशी होत नसल्याचं सांगत विजयकुमार ताले यांनी आज अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
विजयकुमार ताले यांनी अंगावर पेट्रोल टाकून हे टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ताले यांना आत्मदहनापासून रोखत ताब्यात घेतले.
दरम्यान, सावरगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन सचिव पी. पी. चव्हाण यांनी गेल्या सात वर्षापासून ग्रामपंचायतीचा प्रभार दिला नाही. तसेच ग्रामपंचायतीमधील पाणी फाऊंडेशनच्या मिळालेल्या १८ लाखाचे पारितोषिकातून कामे न करता या रकमेचा अपहार केल्याचा आरोप निवेदनातून विजयकुमार ताले यांनी केला होता. परंतु संबंधितांकडून अद्यापही दखल घेऊन चौकशी केली नाही. त्यामुळे विजयकुमार ताले यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Leave a Reply