वर्धेत पावसाचा हाहाकार, मुसळधार पावसाने घेतला ४ जणांचा बळी

वर्धा : १० जुलै – गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात हाहाकार उडाला असून चौघांचा मृत्य तर पुरात वाहून गेलेल्या एकाचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. गेल्या दहा वर्षात असा पाऊस कोसळल्या नसल्याची प्रतिक्रिया शेतकरी संघटनेसह अन्य नेते देत आहे.
वर्धा तालुक्यातील कुरझडी येथील श्रीराम किसनजी शेंडे या वृद्ध शेतकऱ्याचा वीज पडून सायंकाळी मृत्यू झाला. तत्पूर्वी, आज दुपारी कोसुरला येथील गीता गजानन मेश्राम या शेतकरी महिलेचा वीज पडून शेतातच मृत्यू झाला. देवळी तालुक्यातील गुंजखेडा येथील सुमनबाई अरुण गजामे (55) या पुरात वाहून गेल्या. त्यांचा मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने सायंकाळी बाहेर काढण्यात आला. वर्धेलगत पिपरी येथील देवानंद गुलाबराव किन्नाके हे नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेले. स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी दिली. यापूर्वी, शुक्रवारी दुचाकीसह वाहून गेलेल्या अमेय लिहितकर या युवकाचा मृतदेह आज आढळून आला. हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगावच्या पुलावरून पाणी वाहत असताना त्याने दुचाकीवरून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो वाहून गेला. आज शंभर फूट अंतरावर त्याचा मृतदेह व दुचाकी दिसून आली. याशिवाय, काही गावात बैलगाडी वाहून गेल्याच्या घटना आज घडल्या. नदी-नाल्यांना पूर आल्याने असंख्य खेडी वाहतूक व अन्य संपर्कापासून दुरावली आहे.
निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने जलाशयाच्या पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज रात्री दोन्ही काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देत पाणी सोडल्या जाणार आहे.

Leave a Reply