बोरगाव तलावात बुडून युवकाचा मृत्यू

नागपूर : १० जुलै – पाऊस सुरू असताना भटकंती करून मौजमजा करण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांपैकी एकाचा देवळी-सावंगी जवळील बोरगाव तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (९ जुलै) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. मृत पावलेल्या तरुणाचे नाव अनिकेत तिवाडे (वय १८) रा. विदर्भ बिल्डर कॉलनी धनगरपुरा, हिंगणा येथील रहिवाशी आहे.
विदर्भ बिल्डर कॉलनीतील तीन मित्र दोन दुचाकी घेऊन पावसाची मजा घेण्यासाठी देवळी सावंगी रोडवरील बोरगाव तलावावर सायंकाळी ५.४५ वाजता गेले. या ठिकाणी पोहोचल्यानंतर तलावामधील पाण्यात उतरण्याचा मोह अनिकेतला झाला. पाण्यात प्रवेश करताच तो चिखलात बुडाला. हे दृश्य पाहून त्याचे मित्र सत्यम सिंग (वय १५) व प्रथमेश दडमल (वय १६) रा. विदर्भ बिल्डर कॉलनी धनगरपुरा हे घाबरले. त्यांनी धनगरपुर्यातील पंकज गजबे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ही माहिती लगेच हिंगणा पोलिसांना दिली. सहायक पोलिस निरीक्षक तेलरांधे, उपनिरीक्षक राऊत आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. धनगरपुर्यातील नागरिकही मोठय़ा प्रमाणात तलावावर गेले. अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. रविवार, १0 जुलै रोजी सकाळपासूनच पुन्हा शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

Leave a Reply