वेणा नदीपात्रात आढळले दोन मृतदेह

नागपूर : ८ जुलै – नदीच्या पुलावरून जात असलेल्या एका इसमाला नदीपात्रात दोन अनोळखी इसमांचे मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आल्याची खळबळजनक घटना सकाळी साडेदहाच्या दरम्यान बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या रुई खैरी शिवारात घडली. सदर घटनेत अनोळखी मृतक इसमांची हत्या करून त्यांना नदीपात्रात फेकून दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १0.३0च्या सुमारास रुई खैरी शिवारातील वेणा नदीवरील जुन्या पुलावरून एक इसम जात असताना त्याला पुलाखालील नदी पात्रात दोन अनोळखी इसमांचे मृतदेह तरंगताना दिसले. त्याने ही माहिती बुटीबोरी पोलिसांनी दिली. माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड आणि बुटीबोरीचे पोनि भिमाजी पाटील यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. मदतनिसांच्या साहाय्याने दोन्ही मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. त्यात एक पुरुष तसेच एक महिला हे दोन्ही अंदाजे २५ ते ३0 वयोगटातील असून, त्यांना एकाच नायलॉन दोरीच्या साहाय्याने जवळपास २0 ते २५ किलो वजनाच्या दगडाला बांधून होते. या घटनेला अंदाजे आठ तासांचा अवधी झाला असल्याचा संशय व्यक्त करून त्यांना कुणी अज्ञात आरोपींनी त्यांची हत्या करून नदीत फेकले असावे, असा दावा पोलिसांनी यावेळी केला. घटनास्थळी नागपूर ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक राहुल माकनीकर यांनी सदर घटनेत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.
घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रवाना करण्यात आले असून, घटनेची नोंद करण्यात आली आहे. वृत्त लिहितोवर अनोळखी मृतदेहांची ओळख पटलेली नसून ते कामगार श्रेणीतले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत

Leave a Reply