घ्या समजून राजेहो …. उद्धवपंत हा त्रागा कशासाठी?

सध्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवपंत ठाकरे प्रचंड संत्रस्त असल्याचे जाणवते आहे, त्यांचे हे त्रस्त होणे १० जून पासून वाढीला लागले, आणि आता गेल्या आठवड्याभरात त्यांची त्रस्तता प्रचंड वाढीला लागलेली दिसते आहे. त्यामुळे दररोज बैठका घेणे आणि सर्व विरोधकांवर आगपाखड करणे हे काम निष्ठेने सुरु आहे. आता तरं त्यांनी हिम्मत असेल तर मध्यावधी निवडणूक घ्या, असे आव्हान विरोधकांना देऊन टाकले आहे.
उद्धवपंतांची ही चिडचिड का वाढली? याचे कारण उभा महाराष्ट्र जाणून आहे. त्यामुळे त्यावर वेगळे विवेचन करण्याची गरज वाटत नाही, मात्र ही परिस्थिती का ओढवली? याचे कठोर आत्मचिंतन उद्धवपंत आणि त्यांच्या निकटच्या साथीदारांनी करणे गरजेचे आहे. विशेषतः त्यांच्या पक्षात बंडखोरी करून बाहेर निघालेले आमदार जी विविध करणे सांगत आहेत, त्यावर विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र ते न करता विरोधकांवर आगपाखड करणे हाच एककलमी कार्यक्रम उद्धवपंत आणि त्यांच्या साथीदारांनी सुरु ठेवावा ही बाब दुर्दैवी म्हणावी लागेल.
मुळात उद्धवपंतांवर अशी चिडचिड करण्याची वेळ का आली? यासाठी गेल्या ७ वर्षातील घटनाक्रम पुन्हा एकदा वाचकांसमोर मांडणे गरजेचे आहे. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी जागावाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप या दोन पक्षातील युती तुटली होती. ती उद्धवपंतांची पहिली चूक म्हणावी लागेल. त्यावेळी शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आणि भाजपच्या तुलनेत निम्मा जागांवर समाधान मानण्याची वेळ त्यांच्यावर आली, तसे बघता या निकालामुळे उद्धवपंतांनी शहाणे व्हायला हवे होते, मात्र नाईलाज म्हणून भाजपशी युती करत पुढची ५ वर्ष भाजपशी वेळोवेळी संघर्ष करण्यातच त्यांनी आनंद मानला. अर्थात त्यावेळी त्यांनी युती केली नसती तर २०१४ मध्येच शिवसेना फुटली असती, असे बोलले जात होते.
२०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने शिवसेना आणि भाजपची पुन्हा युती झाली. लोकसभेत भाजपच्या जोरावर शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. विधानसभेत देखील भाजपचे १०६ तर शिवसेनेचे ५६ आमदार विजयी झाले. भाजपला अपेक्षेपेखा कमी जागा मिळाल्या होत्या, मात्र शिवसेना आणि भाजप यांनी एकत्रितपणे राज्य करावे असा कौल मतदारांनी दिला होता, हा कौल नाकारून उद्धवपंतांनी खोटे कारण सांगत भाजपशी युती तोडली, आणि ज्या काँग्रेस आणि राहस्त्रवाडीला त्यांचे वडील बाबासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर विरोध केला होता, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत अनैतिक शय्यासोबत करत त्यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपसदसह सत्ता मिळवली, ही उद्धवपंतांची दुसरी चूक होती. याच पाठोपाठ त्यांनी स्वतः मुख्यमंत्रीपदाची झूल पांघरली ही त्यांची तिसरी चूक ठरली. ही चूकच नव्हे तर घोडचूक म्हणता येईल, अशी होती. त्यामुळे संघटना आपल्या हिंदुत्वाच्या भूमिकेपासून दूर जाते आहे, ही टीका तर झालीच पण त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळतांना पक्ष संघटनेकडेही त्यांचे दुर्लक्ष झाले. नंतरच्या अडीच वर्षाच्या काळात, त्यांच्याकडून अनेक चुका झाल्या, त्याचाच परिणाम म्हणजे शिवसेनेत ४० आमदारांनी उठाव करत सरकार अल्पमतात आणले.
एकनाथ शिंदे या निष्ठावंत शिवसैनिकाच्या नेतृत्वात झालेल्या या उठावात सहभागी झालेल्या आमदारांच्या नेमक्या तक्रारी काय? हे उद्धवपंतांनी समजून घेणे गरजेचे होत्र, मात्र तसे न करता शिवसेनेचे प्रवक्ते या आमदारांवर फक्त तोंडसुख घेत राहिले. परिणामी प्रश्न सुटण्यापेक्षा तो जास्त चिघळवल्या गेला. या आमदारांच्या तक्रारी तश्या रास्तच होत्या हे आमदार वेळोवेळी सांगत होते, की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी मैत्र करून आपण हिंदुत्वापासून दूर जातो आहोत, हे चुकीचे आहे. या आमदारांचा असाही आरोप होता, की मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरीही सर्व महत्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत, आणि त्यांचे मंत्री शिवसेना आमदारांना काहीही निधी देत नाही. त्यामुळे शिवसेनेस आमदारांची चांगलीच गोची होते, असेच सुरु राहिले तर दूर मतदारांसमोर तोंड दाखवायला जागा राहणार नाही असाही या आमदारांचा दावा होता. त्यात अनेक हिंदुत्वविरोधी घटना घडल्यामुळे हे आमदार दुखावलेले होता. याशिवाय उद्धव ठाकरे किंवा शिवसेनाईचे वरिष्ठ नेते आमदारांना भेटताही नाही अशी या आमदारांची तक्रार होती, ही तक्रारही तशी रास्तच होती कारण मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धवपंतांची तब्येतीची कुरबुर सुरूच होती, त्यामुळे ते बाहेर जास्त फिरत नव्हते,. मात्र आमदारांचे प्रश्न सुटत नाही म्हणून त्यांची नाराजी वाढत होती.
अश्या प्रकारे नाराजी वाढत असतानाच राज्यसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे शिवसेना नेतृत्व सर्वच आमदारांकर संशयाने बघू लागले,, परिणामी विधानपरिषद निवडणूक आटोपली आणि या आमदारांच्या संतापाचा भडका उडाला पुढे काय झाले? ते सर्व जगजाहीर आहे.
शिवसेना आमदारांची ही कथित बंडखोरी लक्षात आल्यावर जबाबदार व्यक्तीच्या माध्यमातून किंवा प्रसंगी उद्धवपंतांनी पुढाकार घेऊन या आमदारांशी संवाद सढळ असता तर कदाचित परिस्थिती आटोक्यात आणता अली असती. मात्र तसे न करता आमदारांवर अश्लाघ्य शब्दात टीका करण्यात आली त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली. इथे डॅमेज कंट्रोल करण्यात उद्धव ठाकरे कमी पडले हे वास्तव नाकारता येत नाही.
या सर्व प्रकारात शेवटी सरकार पडणार हे निश्चित झाले, त्यावेळी उद्धवपंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले, मात्र शिवसेनेतील व्यक्तीलाच मुख्यमंत्री बनवून भाजपनर शिवसेनेला चांगलीच धोबीपछाड दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत न घेता आम्ही बाळासाहेबाचा शिवसैनिक मुख्यमंत्री बनवला असे नाक उंचावून सांगायलाही भाजप मोकळा झाला. हा शिवसेनेला आणि एक दणका होता. नंतर सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेनेने न्यायालयाचे दरवाजे ठोठवायला सुरुवात केली त्यातही यश न मिळाल्यामुळे सर्वकाही हातातून जाते आहे, असे दिसल्यावर उद्धव ठाकरेंची त्रस्तता नको तेवढी वाढलेली आहे. परिणामी ते दररोज शिल्लक शिवसैनिकांच्या बैठकी घेत असून त्यात शिवसेनेतील कथित गद्दार आणि भाजपवर आगपाखड करीत आहेत. भरीस भर आता आमचीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे गटाने केल्यामुळे आणि शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण तसेच शिवसेनेची मालमत्ता यावर ताबा सांगण्याचा इरादा व्यक्त केल्यामुळे उद्धवपंतांची चिडचिड अधिकच वाढली आहे.
घडलेल्या सर्व घटनाक्रमामुळे उद्धव ठाकरे संतप्त होणे साहजिक आहे, मात्र त्यामुळे परिस्थितीत कोणताही सकारात्मक बदल होणार नाही इतकेच काय तर परिस्थिती जास्त हाताबाहेर जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे उद्धवपंतांनी आता संताप व्यक्त करण्यापेक्षा सर्व संबंधितांना एकत्र घेऊन कठोर आत्मचिंतन करणे आता गरजेचे झाले आहे. कठोर आत्मचिंतन करून ज्या काही चुका झाल्या, त्या समजून घेत त्यावर उपाययोजना करणे आणि त्यातून मार्ग काढणे हेच शहाणपणाचे ठरणार आहे. उद्धवपंतांनी महिलांच्या मेळाव्यात बोलतांना शिवसेनेच्या स्थापनदिनी जी परिस्थिती होती ती परिस्थिती लक्षात घेऊन पुढे चालण्याचे आवाहन केले होते, त्यांनी स्वतःदेखील या आवाहनानुसार वागायला हवे तरच शिवसेनेला बरे दिवस राहणार आहेत. तोवर उद्धवपंत हा त्रागा कशासाठी करता? असाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र विचारात राहणार आहे, याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी.

अविनाश पाठक

Leave a Reply