संपादकीय संवाद – सचिन वाझे प्रकरणात फक्त बडतर्फी पुरेशी नाही

गेले दोन महिने देशभरात गाजत असलेले मुंबई पोलिसातील अधिकारी सचिन वाझे यांना अखेर मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी बडतर्फ केले आहे. परिणामी सचिन वाझेंची पोलीस दलातील दुसरी इनिंग अवघ्या दहा महिन्यात संपुष्टात आली आहे.
सचिन वाझे हे महाराष्ट्र पोलीस दलातील एक वादग्रस्त अधिकारी म्हणूनच गाजले होते २००४ मध्ये एका गॅंगस्टरच्या एन्काउंटर प्रकरणात यांच्यावर निलंबनासह फौजदारी कारवाई करा असा आदेश न्यायालयाने दिला होता ते न्यायालयीन प्रकरण आजही निकालात निघाले असल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही तरीही राज्यातील महाआघाडी सरकारने जून २०२० मध्ये विशेष बाब म्हणून सचिन वाझेंना परत नोकरीत घेतले होते. त्यानंतर अनेक वादग्रस्त प्रकरणे हाताळण्यासाठी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांच्या पापाचा घडा भरला तो मुकेश अंबानींच्या अँटोलीया या निवासस्थानासमोर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात त्यांचे नाव घेतले गेल्यावर. त्यानंतर ज्या गाडीत स्फोटके ठेवली होती त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याची हत्या करण्यात आली याप्रकरणात केंद्राच्या एनआयए ने तपास हाती घेतल्यानंतर सचिन वांझेच्या सहभागाचे धागेदोरे मिळाले आणि त्याला अटक करण्यात आली या अटकेमुळे राज्यशासनाला इच्छा नसतानाही त्याला निलंबित करावे लागले.
इच्छा नसतानाही असे म्हणण्याचे कारण म्हणजे विधिमंडळ अधिवेशनात राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आणि इतर दिग्गज सचिन वाझेंचा विधिमंडळात संपूर्ण ताकदीने बचाव करत होते सचिन वाझेच्या निलंबनाची आणि अटकेसाठी इतका गोंधळ का करता तुम्हाला साची वाझे हा लादेन वाटतो काय? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला होता नंतर याच मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेचे निलंबन करावे लागले आणि आता त्याच्या बडतर्फीवरही शिक्कामोर्तब करावे लागले आहे. त्यामुळे वाझे हा लादेन आहे काय? असे विचारणाऱ्या उद्धवपंत ठाकरेंना होय सचिन वाझे हा लादेनच आहे अशी कबुली द्यावी लागली आहे.
मुळातच सचिन वाझेला न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले होते त्यानंतर त्याने २००८ च्या दरम्यान नोकरी सोडण्याचाही प्रयत्न केला होता मात्र त्याची निवृत्तीची मागणी तत्कालीन सरकारने पूर्ण केली नव्हती त्यावेळी वाझेने शिवसेनेतही प्रवेश केला होता अश्या व्यक्तीला विशेष बाब म्हणून शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या इच्छेवरून (?) नोकरीत परत घेतले जाते आणि तशी तरतूद नसतानाही त्याच्याकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातात हा सर्व प्रकार संशयास्पद वाटतो अशी नियमबाह्य फेरनियुक्ती करण्यामागे नेमकी काय कारणे झाली यातील सत्य आजतरी उघड झालेले नाही मात्र ते उघड होणे गरजेचे आहे
सुदैवाने अंबानींच्या घरासमोरील स्फोटके आणि मनसुख हिरेनची हत्या या प्रकरणात एनआयएने लक्ष घातल्यावर बऱ्याच बाबी उघड झाल्या आहेत. याच वेळी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी वाझे गृहमंत्र्यांसाठी खंडणी गोळा करत होता असा आरोप केल्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला असून आता सीबीआय आणि ईडी या दोन्ही संस्थांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे
या सर्व बाबी लक्षात घेता आता फक्त वाझेंची बडतर्फी करून चालणार नाही वाझेंना फेरनियुक्त करण्यामागे कोणाचा हात होता त्याच प्रमाणे नियम डावलून त्याच्याकडे वादग्रस्त प्रकरणे का सोपवण्यात आली आणि त्याने शेवटल्या टप्प्यात केलेली वादग्रस्त कामे कोणाच्या इशाऱ्यावरून केली हे वास्तव समोर यायलाच हवे त्यासाठी सचिन वाझे प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याच्यासोबत कोण कोण गुंतले आहे हे वास्तव महाराष्ट्रातील जनतेसमोर यायला हवे.

अविनाश पाठक

Leave a Reply