पूर परिस्थितीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा – मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : ५ जुलै – राज्यात धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक शहरे पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर वाढत असल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये, यासाठी पूर परिस्थितीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत
जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली आहे. खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांना पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट झाले आहे. जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
विशेषत: रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईतील परिस्थितीवर देखील मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
कोल्हापूरात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून 8 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे एका दिवसात 6 बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. येथील राजाराम बंधारासुद्धा सायंकाळी पाण्याखाली गेला. सद्यस्थितीत राजाराम बंधाराची पाणी पातळी 17.5 फुटावर आहे. त्यामुळे हा बंधारा आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळपासूनच सुरू झालेला पाऊस अद्याप देखील थांबलेला नाही. त्यातच हवामान विभागाकडून पुढील काही दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्याच गांभीर्य लक्षात घेत मुंबई व मुंबई उपनगरासह कोकण किनारपट्टीच्या भागात टीम तैनात करण्यात आल्या आहेत
दरवर्षी मुंबईमध्ये पावसाळ्यात अनेक भागात पाणी तुंबत व त्यामुळे परिस्थिती निर्माण होते. मुंबईतील सायन, दादर, हिंदमाता परिसर या भागात मोठ्या प्रमाणात दरवर्षी पाणी साचत. तर, उपनगराचे अनेक भागात देखील अशीच समस्या पाहायला मिळते. त्यासोबतच अनेक वेळा मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना देखील घडत असतात. यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या एकूण पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply