सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

रामायण ते रामायण व्हाया महाभारत

पुत्र मोहाने महाभारत घडलं, तर पुत्र मोहाने रामायण घडले. महाभारताचा शेवट कौरवांसाठी घोर अपराध ठरला तर रामायणाचा शेवट गोड झाला. चार ही भावांची एकी, आपापसातील आदर, आपापसातील प्रेम दिसले. रावणाचा अंत झाला त्यासाठी प्रभू श्रीरामाचे धरतीवर आगमन झाले होते आणि शेवट गोड झाला. रामायणा मध्ये तर सुर्यवंशी घराण्यात आपापसातील लढाई. कशासाठी तर राजा दशरथाने दिलेल्या वचनाची पुर्ती – तर काय? उद्या प्रभू श्रीरामांना राज्याभिषेक होणार आणि कैकेयी राजा दशरथाला त्यांनी मागितलेल्या दोन वरांची आठवण करून देते आहे आणि वचनपूर्ती ची मागणी. हो! तिला मिळालेले दोन्ही वर संयुक्तिक होते. राजा दशरथाने राणी कैकेयी ला दिले होते. कुठलीही लपवाछपवी नव्हती आणि ऐन समेवर, जिथे प्रभू श्रीरामांनी राजवस्त्रे घालायची तिथे वल्कले घालून चौदा वर्षाचा वनवास नशीबी आला.
श्रीरामांनी एका ही शब्दाने पित्याचा शब्द मोडला नाही. ना गादीवर राजहक्क सांगितला. पित्याची आज्ञा शिरसावंद्य सोबत सीतामाई पतीच्या पावलावर पाऊल ठेवून तर लक्ष्मण मागोमाग श्रीरामांच्या प्रेमाखातर.
एका झटक्यात बदललेले वातावरण – उत्साहाचे वातावरण एकदम गंभीर पणे बदललेले. भरत म्हणतोय जाऊ नकोस, तुझ्या नावाचे असणारे राज्य मी करु शकणार नाही. नाही तर तुझ्या पादुका दे राजगादी वर पादुका ठेवून कार्यकारी राज्यपद भुषवितो आणि रामा परत आल्यावर राज्य घे रे बापा परत! हमसे ना हो पाएगा!
राजा दशरथाने दिलेल्या दोन वचनांनी राम राजा होणाऱ्या राज्यात हल्लकल्लोळ माजला. पण वाचकहो! एक गोष्ट विसरतोय आपण! सर्व खेळ राजनिती ला अनुसरून होता. त्यात कोणी ही कोणाला प्रतिप्रश्न केला नाही. पुत्र मोहाच्या, दोन वचनांच्या पुर्तीसाठी खेळल्या गेलेली काळी गडद राजनिती, केवळ पुत्र मोहापायी की भरताला राज्याभिषेक आणि रामाला वनवास.
वरील दोन्ही पर्व बघितले तर रामायणाचा सुखान्त झाला तर महाभारतात विदारक सलग अठरा दिवस युद्ध झाले. अगणित रक्त सांडले, अगणित मृत्यू पावले तर राजनिती च्या ह्या खेळात शंभर पुत्र असणारी गांधारी, राजा धृतराष्ट्र पुत्र हीन झाले.
असे का झाले? दोन्ही जागी पुत्र मोहाने पाया रचला होता. महाभारताचा अंत विदारक झाला. पांडव जिंकले मान्य आहे. पण त्यासाठी अर्जुनाला गिता सांगितली, मनाची तयारी करवून घेतली. शस्त्रास्त्रात अतिकौशल पण मनाने तयार नसणाऱ्या अर्जुनाच्या मनाची तयारी पासून सुरुवात करुन द्यावी लागली. का? तर नितीमत्ता विसरलेल्या उन्मत्त कौरवांची जिरवायची होती म्हणून. तर रामायणामध्ये राजघराण्यातील संघर्ष असला तरी पुत्र मोहाने प्रेरीत कैकेयीने घेतलेल्या वचनांची पुर्ती संपुर्ण कुटुंबाने आपले राजकर्तव्य ह्या भावनेने पार पडले. राजा दशरथाने वचन दिले ते पुर्ण करण्यासाठी मनावर दगड ठेवून कर्तव्यपुर्ती केली, निती, नियम, नितीमत्ता ह्या सर्व कक्षांचे पालन तंतोतंत पाळले गेले म्हणून रामायणाचा शेवट गोड झाला. रावणाचा अंत झाला, सीतामाता परत आली, बिभीषण सोन्याच्या लंकेचा अधिपती झाला आणि विजयी श्रीराम अयोध्येत परत आले ती दिवाळी आपण आजही साजरी करतो.
दिलेल्या वचनांची आपली प्रतिष्ठा असते, दोन माणसांच्या वचनांच्या देवाणघेवाणीमध्ये वचनाचे वलय असते आणि दिले असेल तर ते पुर्ण करावे लागते.
ह्याचा आजच्या राजकारणाशी कुठे संदर्भ लागतो का? पुत्र मोह सगळ्या विश्वात व्याप्त आहे. त्याचप्रमाणे तो भारताच्या राजकारणात पण सक्रिय आहे. लालूप्रसाद ची पार्टी आता तेजस्वी चालवतोय, कॉंग्रेस ची पार्टी वंशपरंपरागत राहुल, प्रियंका कडे येणार, राकॉं पुढे सुप्रिया ताई किंवा अजित पवार ह्यांची तर तिसरी फळी पण तयार आहे. अशा सर्व प्रकारचे पक्ष पुत्र मोहापायी वेडे हळूहळू संपायला लागले आहेत. कारण ते गांधारी सारखे, धृतराष्ट्रासारखे अनिती ने माखल्या राजकारणासारखे असत्याचे बोट धरीत राजनिती खेळत आहेत. कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलायला लावीत आहेत तर एकदा पक्ष राजकारणात आला की स्वतः राजा असल्यासारखे वागत आहेत. राजनितीत तुम्ही तेव्हाच् जिंकु शकता जेव्हा तुमच्या पुत्रात राजकिय नैतिकता सांभाळण्याची पात्रता आहे. तुमची नितीमुल्ये पारदर्शी आहेत आणि जगाच्या राजकारणाशी तोडीने खेळण्याची तुमची उमज आहे. जे रामायणात घडले. कैकयी ला जसा पुत्र मोह तसा राजा दशरथाला पुत्र मोह नव्हता का? होता पण निती नियमांचे सर्वांनी पालन केले. त्यात पुत्रवियोगाचे दु:ख झाले आणि राजा दशरथाचा मृत्यू झाला. तरी पण राजकारणातील अराजक एकाही भावाने माजू दिले नाही तर आपापसातील प्रेम व्यक्त केले ते त्याग रुपाने. लक्ष्मण सक्ती नसताना प्रेमापोटी वनवासाला निघाला. राजा भरत असूनही रामाच्या पादुका ठेवून राज्य केले. का! तर वडिलांनी दिलेल्या आपल्या धर्मपत्नीच्या वचनाला जागण्यासाठी.
पुत्र मोहाने “शिवसेना” ही संपली. ज्यावेळी उद्धव ठाकरे ला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या पदी उद्धव ठाकरे विराजमान झाले आणि त्याच दिवशी शिवसेना संपली. त्यावेळी युद्ध झाले असते तर कृष्णाने रणांगणात राज ठाकरेंना हेच सांगितले असते अरे! उचल तो शिवसेनेचा धनुष्य बाण आणि खेच ती प्रत्यंचा, विजय तुझाच आहे.हे “धनुष्यबाण” चिन्ह पण तुझेच आहे. उद्धव तर केंव्हाच राजकारणातून खल्लास आहे. त्याला राजकारण समजत नाही. तो हाडाचा फोटोग्राफर आहे. त्याला नवीन कॅमेरा दे आणि राज ठाकरे तू “धनुष्यबाण” घे. पण असे होणे नव्हते. उद्धव ठाकरेला शिवसेना दिली आणि त्या दिसापासून मासागणिक शिवसेना तोळामासा व्हायला लागली. शिवसेनेला पहिला झटका पडला तो २००९ साली जेव्हा भाजपा ला एक सीट जास्त मिळाली. आतापर्यंत १९९० पासून निवडणुकीत शिवसेना जास्त सीट घेऊन आघाडीवर असायचा आणि भाजपा छोटा भाऊ पाठिशी असायचा. २००९ साली उद्धव ने शिवसेनेचा सारीपाट सांभाळला आणि शिवसेनेची पडझड सुरू झाली. हाच् जर पुत्र मोहाने जर शिवसेनेचे मुल्यांकन केले गेले नसते. ऊद्धव च्या जागी राज ठाकरे शिवसेनेचे अधिपती असते तर शिवसेना आज फार वेगळ्या उंचीवर राहिली असती असे राहुन राहुन वाटते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या धाटणीत तयार झालेले राज ठाकरे, त्यांची बोलायची ढब, दरारा, भेदक नजर डिट्टो बाळासाहेब. त्यांनी आत्ता केलेले भाषण जिथे शरद पवारांच्या नाड्या उसवल्या होत्या. मग पळता भुई थोडी, शरद पवारांना पत्रकार परिषदा घेऊन आपली बाजू मांडावी लागली होती. हा धाक हा दरारा ऊद्धव ठाकरे मध्ये कधी ही दिसला नाही.
तसे पाहिले तर शरद पवारांचे राजकारण निकृष्ट दर्जाचे. त्यांनी ज्या कोणाशी युती केली आहे त्या पक्षालाच संपवायचे राजकारण त्यांनी केलेले. आपला पॅंथर आठवले साहेब बघा त्या जमान्यात ह्या पॅंथरची काय भेदक डरकाळी होती! पण पवारांशी युती झाली आणि आता दोन चार सीटा घेऊन फालतू यमकाच्या कविता जुळवत राजकारण करताहेत.
त्याचप्रमाणे भाजपा-शिवसेना युती २५ वर्षे रामायणातील युती नंतर मुख्यमंत्री पदासाठी राजकारण खेळलं गेले आणि महाभारत घडले.
इथे पण वचनांचा घोळ होता पण बंद दाराआड दिल्या गेल्या वचनांचा. अमित शहा म्हणतात की बंद दाराआड दिल्या गेल्या वचनांचे साद सामान्य जनांपर्यंत पोहोचू द्यायचे नसतात. बंद दाराआड ची वचनं कुठल्याही परिस्थितीत पाळायची असतात. आणि वचनं देणारा नी घेणारा दोघांना ते वचन मान्य हवे. तर ५०-५० चे वचन दिले म्हणून ऊद्धव डंका पिटतोय तर भाजपा ना ना म्हणाली. मग शिवसेना दुसरी खेळी खेळली की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनविण्याचे वचन दिले म्हणून शिवसेना २५ वर्षांची रामायण वादी युती तोडून महाभारतासारख्या संहारक पक्षांकडे वळली. नियत, नितीमत्तेचे, राजकीय नियम झुगारून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी तत्वांच्या डोळ्यावर पट्टी बांधून, शिवसेनेच्या धनुष्यबाणाची प्रत्यंचा मागे ओढून बाणाची दिशा भाजपाच्या दिशेने वळविली आणि मोदींच्या नावावर निवडून आलेली शिवसेना, एका मुख्यमंत्री पदाच्या लालसेपायी शरद पवार आणि सोनिया गांधी ह्यांचे चरणी रूजू झाली. “हेची दान देगा काका – माझा मुख्यमंत्री व्हावा” !
ज्यावेळी तुम्ही वडिलांच्या तत्वांशी घोर प्रतारणा करता, रयतेच्या कल्याणासाठी कामे करायचे सोडून मुसलमानांचे लांगूलचालन करता, बाळासाहेबांनी सांगितलेले की ज्या दिवशी शिवसेनेची कॉंग्रेस बरोबर युती होईल त्यादिवशी मै दुकान बंद कर दुंगा! खरेच्! विश्वास ठेवायला नको का! की बाळासाहेबांनी दिलेले वचन आज स्वर्गातून पुर्ण केले. ५६ सीटांची शिवसेना त्यातील एकाचा दुबई मध्ये मृत्यू तर ४० आमदार पळुन गेले! कारण काय तर! त्यांना हिंदुत्ववादी बाळासाहेबांच्या तत्वावर चालणारी हिंदुत्ववादी शिवसेना हवी होती. हे सगळे महाभारत का घडले? कारण वचने जी काही सांगितली ती एक तर दिली गेली नसावीत. आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवितो असे वचन जर दिले असेल तर पक्षनेतृत्व तिथे मुख्यमंत्री पदी बसले. हे दुसरे वचन चुकले. आणि सत्ता हाती आल्यावर “जेव्हा जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकुश होते तेव्हा कोणाला तरी चाणक्य बनून चंद्रगुप्त शोधावा लागतो” फडणवीसांनी अडीच वर्षाच्या सत्तेच मापन एका वाक्यात सांगितले. आणि मविआ आघाडीच्या सत्तेने काय माज करुन महाराष्ट्र नासवला ह्याचे सुचक वाक्यात समर्पित समापन केले.
आजच्या घडीला उद्धव ठाकरे देखील पुत्र मोहाने पिडीत पिता. पण दुर्योधनाच्या भुमिकेत शेवटच्या घटका मोजतोय. “धनुष्यबाण” हे चुनाव चिन्ह मिळते का नाही! शेवटला श्वास घेत आहे. प्रतोदाचे अधिकार कदाचित हातातून सटकून जाणार अशी अवस्था आहे. “शिवसेना” कुणाची ह्या प्रश्नचिन्हावर सगळ्यांची नजर आहे. ५६ पैकी चाळीस आमदार शिवसेनेसाठी धाराशाई झालेले पण शिवसेना गादीवर हक्क सांगणारे. कधी ही घराबाहेर न पडणारा मुख्यमंत्री आता शिवसेनेचे अस्तित्व स्वतः कडे ठेवण्यासाठी झटतोय. अडीच वर्षात माजलेली, उतलेली, मातलेली मविआ आघाडीतील शिवसेना आता रस्त्यावर आली. औट घटकेचं राज्य घेऊन उद्धव ठाकरे नी काय साध्य केलं? स्वतः चे महाभारत करून घेतलेली “शिवसेना” पुन्हा रामायणा कडे वाटचालीस निघालेली, भाजपा युतीत सामावली. . अडीच वर्षात शिवसेना घुसळली गेली आणि त्याचे नवनीत परत भाजपा चरणी युतीत आलेले. बाकी पाणी चोथा ऊद्धवाच्या वाट्याला आलेले.
ऊद्धव ठाकरेंनी ज्या ज्या वेळेस विधानसभेत भाषण केले ते भाषण वैयक्तिक पद्धतीचे टोमणे बाज असणारे होते. वाटायचे की सहज सत्ता मिळाल्यावर जर त्याने कुठले कष्ट न घेता सत्ता मिळाली की जे नीरस असे त्यांचे भाषण असायचे. आत्मविश्वासाची उणीव असणारे भाषण असायचे. पण जेव्हा जमिनीवर काम करणारा लहान कार्यकर्ता ते मुख्यमंत्री बनलेला शिंदे जेव्हा मुख्यमंत्री बनतो त्यावेळी सव्वा तास चालणारे भाषण देखील किती श्रवणीय आणि देखणीय असू शकते. त्यांनी एकेकाचे नाव घेत हास्यकल्लोळ उडवून दिला तर मार्मिक कोट्या करीत नाल ठोकली तर काही प्रसंगी आसवे गाळलीत. हे जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे बक्षीस होते की त्यांना मुख्यमंत्री पद बहाल झाले.
(संजय राऊत बद्दल अवाक्षर लिहीले नाही. कारण सल्लागार बदलता येतो. ज्या सल्लागाराने शिवसेनेला आग लावली तरी ऊद्धव ठाकरे काहीही करू शकले नाही ह्याचाच् अर्थ उद्धव ठाकरे ह्यांना ती दृष्टी नाही) परत ऊद्धव ठाकरे परत पुत्र मोहाने ग्रासलेले! ये तो होना ही था!
शिवसेनेमध्ये मोठे महाभारत झाल्यानंतर, कृष्णाने आपली भुमिका चोख बजावल्या नंतर गादीवर योग्य व्यक्तिच्या हाती दिल्यावर भाजपा शिवसेना युती परत रामायणाकडे (निती, नियम, नितीमत्ता पाळणारी म्हणून रामायण) वाटचाल करायला लागली आहे असे म्हणायला हरकत नाही.
राजकारणात नितीमुल्ये, सत्य वचनांच्या पुर्ततेसाठी त्याग, नितीमत्तेवर आधारित जनकल्याणाचे राजकारण केले तर शिंदे मुख्यमंत्री आणि त्यागाचे प्रतीक उप मुख्यमंत्री फडणवीस कधी ही बनले नसते एवढे खरे!
एकदा शिवसेनेचे चुनाव चिन्ह “धनुष्य बाण” शिंदे गटाला मिळाला, शिवसेना भवन शिंदे गटाचे स्वाधीन झाले की समजायचे की दुर्योधनाची मांडी फोडली. (मविआ आघाडी मध्ये भरपूर पात्रे आहेत – वाचक आपापल्या परीने दुर्योधन निवडू शकतात. कोणाला ही दुखवायचा हेतू नाही)

भाई देवघरे

Leave a Reply