धावत्या बसला लागली आग, दोन तरुणांच्या प्रसंगावधनाने पुढील अनर्थ टळला

औरंगाबाद : ४ जुलै – प्रवाशाना घेऊन जाणाऱ्या धावत्या बसला अचानक आग लागली.मात्र चालक अनभिज्ञ होता. हा प्रकार पाहून दोन दुचाकी स्वार तरुणांनी बसचा पाठलाग करीत तिला थांबवून आग विझवली यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना औरंगाबाद- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रोटेगाव उड्डाणपुलावर घडली.
वाशीम-नाशिक ही एसटी बस (एमएच ४० वाय ५६६१) नाशिककडे जात असताना खंडाळानजीक बसच्या पाठिमागून अचानक धूर निघायला लागला. काही वेळातच बसने पेट घेतला व आगीचे लोळ बाहेर पडताना दिसू लागले. त्याचवेळी वैजापूर येथील माजिद शेख व सचिन साकला हे दोघेजण दुचाकीवरून खंडाळा येथून वैजापूरकडे येत होते. त्यांना हा प्रकार निदर्शनास आल्याने त्यांनी बसचा पाठलाग सुरू केला.
एसटी बसचा वेग जास्त असल्यामुळे त्यांना पाठलाग करणे अवघड जात होते. बसने मागून पेट घेतला. परंतु चालकाला त्याची कल्पनाही नव्हती. या दोघांनी कसाबसा पाठलाग करून बस शहरानजीकच्या रोटेगाव उड्डाणपुलावर थांबवून चालकाला ही माहिती दिली. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखून सर्वप्रथम ३० प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. यानंतर अग्निरोधक यंत्राच्या साह्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
या घटनेची माहिती वैजापूर पोलिस ठाण्यासह अग्निशमन दलास कळवण्यात आली होती. काही वेळातच दोन्हीही यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत बसमधील आग नियंत्रणात आणण्यात यश आले होते. तरुणांनी प्रसंगावधान दाखवत बस चालकाला वेळीच माहिती दिल्याने पुढील अनर्थ टळला.

Leave a Reply