संपादकीय संवाद – महाराष्ट्रातील नव्या सरकारचे स्वागत

गत १० दिवसातील राजकीय घडामोडी संपून अखेर महाराष्ट्रात नवे सरकार सत्तारूढ झाले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत, तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेते झाले आहेत. याचवेळी विधानसभेचे विशेष सत्र सुरु होऊन विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवडही झाली आहे, या सर्व मान्यवरांचे पंचानामातर्फे हार्दिक अभिनंदन.
यापूर्वी जे सरकार सत्तेत आले होते, ते जनादेशाचा अवमान करणारे सरकार म्हणून ओळखले गेले होते. या सरकारचा सर्वच स्तरात विरोध होत होता, त्यातही भिन्न विचारधारा असणारे तीन पक्ष केवळ सत्तेसाठी निवडणूक संपल्यानंतर एकत्र आले होते, यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना मतदारांनी विरोधी पक्षात बसण्यासाठी कौल दिला होता, तर शिवसेनेला भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी जनादेश होता, मात्र हा जनादेश नाकारून केवळ तांत्रिक आधारावर सत्ता मिळवण्यात हे यशस्वी झाले आणि महाविकास आघाडीच्या नावाखाली सरकार चालवले. इथे तीनही पक्षांच्या भिन्न विचारधारा होत्या, त्यामुळे जनहिताची कामे काहीच झाली नाहीत, जनसामान्य कायम अडचणींचा सामना करत होते.
हे सरकार अंतविरोधानेच पडेल असे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगत होते, तसे अंतर्विरोधानेच हे सरकार पडले, आणि आता शिवसेनेतील हिंदुत्वाचीकास धरणारा गट आणि भाजप अश्या समविचारी मंडळींनी एकत्र येऊन हे सरकार बनवले आहे. हे सरकार आता महाराष्ट्राच्या हितासाठी पाऊले उचलेल अशी आशा करायला हरकत नाही.
हे सरकार महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जाईल, यासाठी पंचनामातर्फे नव्या सरकारला हार्दिक शुभेच्छा ….

अविनाश पाठक

Leave a Reply