तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातून बच्चू कडूंना क्लीनचीट

मुंबई : ३० जून – महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता भाजप-शिंदे गटाचं सरकार राज्यात स्थापन होईल, हे जवळपास निश्चित झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या सोबत अपक्ष आमदार आणि राज्यमंत्री बच्चू कडू हे देखील होते. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे.
बच्चू कडूंना तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातून क्लीनचीट मिळाली आहे. अस्तित्वात नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी 95 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप त्यांच्यावर होता. वंचित बहूजन आघाडीच्या तक्रारीनंतर बच्चू कडू यांच्यावर आरोप झाले होते. हे प्रकरण कोर्टात दाखल होतं. मात्र आता संपूर्ण प्रकरणात पुरावे नसल्याचं कारण देत पोलिसांनी बंद केलं आहे.
बच्चू कडू यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांना निधी देत 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिफारस केलेली रस्त्यांची कामं पालकमंत्री कडूंनी डावलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला डावलत आपल्या मर्जीतील रस्त्यांची कामं नियमबाह्यपणे करून घेतल्याचा आरोप वंचितनं केला.
यातील दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले होते. या तीन रस्त्यांच्या कामांत बच्चू कडूंनी एक कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. वंचितच्या तक्रारीनंतर अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी या तीन रस्त्यांसह 25 कामांना स्थगिती दिली होती.

Leave a Reply