घरातच राहून ९३ वर्षीय बाबुरावांनी केली कोरोनावर मात

पुणे : ११ मे – कोरोनाबाधित ९३ वर्षीय आजोबांना घरी घेऊन जा, उपचारांचा काही उपयोग होणार नाही, असं सांगून डॉक्टरांनी वृद्धाला घरी पाठवलं. मात्र आजोबांनी घरीच उपचारांना साथ देत प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली आहे. सातारा जिल्ह्यातील ९३ वर्षीय बाबूराव सुतार यांनी धीर सोडणाऱ्या कोरोनाग्रस्तांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मल्हारपेठमध्ये ही घटना समोर आली आहे. कोयना कृषक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र शासनाने सहकार महर्षी पुरस्काराने सन्मानित केलेले बाबुराव कृष्णाजी सुतार उर्फ आण्णा यांनी वयाच्या 93 व्या वर्षी प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
कोरोना झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना दवाखान्यात अॅडमिट न करता घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यांचं आयुष्य काही दिवसांचं असून त्यांना खाऊपिऊ घाला. या वयात उपचारांचा काही उपयोग होणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते.
अण्णांना त्यांच्या कुटुंबीयांनी घरी परत आणले. धीर न सोडता घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने फोनवरुन तसेच इतर माहिती घेऊन शक्य ते अनेक उपचार केले. आजोबांनीही या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत कोरोनावर मात केली. हा नव्या युगातील नवा रोग असून एकदम उद्भवतो, त्याचे स्वरुप दिसत नाही. मी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर वाचलो अशी प्रतिक्रिया आजोबांनी दिली
आजोबांना 5 एप्रिल 2021 रोजी कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट आला होता. छातीत खूप इन्फेशन होते. हॉस्पिटलमध्ये नेले असता
आपण यांना घरी घेऊन जा. घरीच चार पाच दिवस सेवा करा. या वयात उपचारांचा काही उपयोग होणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते.
आजोबांना घरी आणल्यावर श्वास घेताना अडचण होत होती. ताप येऊन घसा दुखत होता. ऑनलाईन पद्धतीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरु केला. ऑक्सिजन लेव्हलही कमी होती, म्हणून घरातच ऑक्सिजन मशीन लावले. सर्व उपचार पद्धती केल्यावर एनर्जी सायन्सचे काही विशेष उपाय केले. घरातील वातावरण फ्रेश होण्यासाठी उपाय केले. काही विशेष प्रार्थना केल्या. त्यांच्या उपचारासाठी कुटुंबातील सर्वांनी घेतलेल्या कष्टाचा फळ मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांचे पुत्र अधिक बाबूराव सुतार यांनी दिली. कोणत्याही वयात प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कसल्याही संकटावर मात करता येते हेच आजोबांनी दाखवून दिले आहे.

Leave a Reply