राज्यशासनाने म्युकोरमायकोसिस आजारावर मात करण्यासाठी कसली कंबर

मुंबई : ११ मे – कोरोनाइतक्याच प्राणघातक असलेल्या म्युकोरमायकोसिस आजाराचा राज्यभरात वेगाने फैलाव होत असल्यामुळे आता ठाकरे सरकार कमालीचे सावध झाले आहे. हा आजार दुर्मिळ असल्याने राज्यात आतापासूनच त्यावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटला म्युकोरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या १ लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती दिली. म्युकोरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून त्याबाबत तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत या आजारावर मोफत उपचार करता येतील का, याबाबत विचारविनिमय सुरु असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्य सरकारने रेमडेसिविर इंजेक्शनसाठी सहा कंपन्यांना 3 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे. हा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे. याशिवाय, म्युकोरमायकोसिसचे रुग्ण वाढत असल्याने त्यासाठी हाफकिन संस्थेला एक लाख इंजेक्शन्सची ऑर्डर देण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा 6 लाखाच्या खाली आला आहे. रिकव्हरी रेट 87 टक्के इतका झाला आहे. आपण चाचण्यांची संख्या कुठेही कमी केलेली नाही. सध्या दिवसाला 2 लाख कोरोना चाचण्या होत आहेत.

Leave a Reply