शिंदे गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर मनसेचे वेट अँड वॉच – बाळा नांदगावकर

मुंबई : २७ जून – एकनाथ शिंदे गट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत विलीन होणार का या मुद्द्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बोलणं टाळलं. परंतु त्याने या मुद्द्याचं खंडन देखील केलं नाही. सध्या यावर आता भाष्य करणे घाईचे ठरेल, असं ते म्हणाले. त्यामुळे शिंदे गट मनसेत विलीन होणार की नाही ही चर्चा कायम आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत मनसेची वेट अँड वॉचची भूमिका आहे, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली.
राजकीय सत्ता संघर्षात मनसेच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षप्रमुख राज ठाकरे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत मनसेची वेट ॲंड वॉचची भूमिका आहे. या घडीला यावर भाष्य करणे प्रीमॅच्युअर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. पण सोबतच शिंदे गटाच्या मनसेत विलिनीकरणाच्या मुद्द्याचं खंडनही नाही.
महाराष्ट्रात राजकीय सत्तासंघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदे गट आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करत आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना आणि सरकार वाचवण्यासाठी कसरत करत आहेत. आता महाराष्ट्राच्या राजकीय सत्ता संघर्षात मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उतरले आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्याशी दोन वेळा फोनवरुन चर्चा केली. महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याचं शिंदे गटाकडून सांगण्यात आलं.

Leave a Reply