नागपुरात एकनाथ शिंदेचा पुतळा शिवसैनिकांनी फुंकला

नागपूर : २६ जून – शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ राज्याच्या उपराजधानीत शिवसैनिक आज रस्त्यावर उतरले, संतप्त शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे मुर्दाबादचे नारे देत शिंदेचा पुतळा जाळून आपला निषेध व असंतोष व्यक्त केला.
२० तारखेपासून बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंसोबत सुरत नंतर गुवाहाटीत वास्तव्याला आहेत, तिथून त्यांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, त्याच्या निषेधार्थ राज्यात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत, आज नागपूरचे जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात रेशीमबाग येथील शिवसेना भवनासमोर संतप्त शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे व बंडखोर आमदारांविरुद्ध मुर्दाबादचे नारे देत आपला रोष व्यक्त केला, निम का पत्ता कडवा हैं ….. , उद्धव ठाकरे आज बढो हम तुम्हारे साथ हैं असे नारे शेकडो शिवसैनिकांनी देऊन रेशीमबाग चौकात रास्ता रोको करून एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन केले, त्यांच्या पुतळ्याला जोडे, चपला व लाथांनी मारहाण केली. बंडखोर आमदार स्वगृही परातल्यास उद्धव साहेब स्वागत करतील, पण बंडखोर आमदारांनी आपला हेका सुरु ठेवला तर राज्यात त्यांचा तीव्र निषेध करून शिवसैनिक रस्त्यावर उतरतील असा इशारा नागपूरचे जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांनी यावेळी दिला. या आंदोलनात अजय दलाल, राजू कनोजिया, दीपक शेंद्रे, शहरप्रमुख नितीन तिवारी, मुन्ना तिवारी, ओंकार कडू, शाहू, यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.

Leave a Reply