विदर्भात वीज पडून ८ जणांचा मृत्यू, ६ जखमी

नागपूर : २४ जून – पावसाने हजेरी लावल्याने शेतकामांना गती आली आहे. मात्र, शेतात काम करताना वीज कोसळून मृत्यूच्या घटनाही घडत आहेत. अंगावर वीज पडून अमरावती जिल्ह्यात तीन, नागपूर दोन तसेच गोंदिया जिल्ह्यात तीन जणांना जीव गमवावा लागला. सहा जण जखमी झाले. तर भंडारा जिल्ह्यात जनावरे दगावली. या घटना गुरुवारी (ता. २३) घडल्या.
गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोरटोला सावरटोला येथील पवन मनोहर गुढेवार (वय २८) याचा वीज पडून मृत्यू झाला. दुपारी एकच्या सुमारास पवन शेतात गेला होता. दरम्यान, अचानक पवनच्या अंगावर वीज कोसळली. त्याला नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पवन हा एकुलता एक मुलगा होता.
तसेच गोरेगाव तालुक्यात वीज पडून जोशीराम उईके (वय ५०, रा. बोळुंदा), रामेश्वर ठाकरे (वय ५२, रा. घोटी) यांचा मृत्यू झाला. बोळुंदा येथील शेतकरी जोशीराम उईके शेतात असताना त्यांचा बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. तसेच गुरुवारी गहेलाटोला येथे दीनदयाल पटले यांच्या शेतात काम करणारा घोटी येथील शेतमजूर रामेश्वर ठाकरे यांचाही वीज पडल्याने मृत्यू झाला. रामप्रसाद बिसेन (वय ४९, रा. जानाटोला) व झामाजी कुर्वे (वय ५८, रा. झांजिया) हे जण जखमी झाले.
अमरावती : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २३) दुपारी अडीच ते चारच्या सुमारास वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले. अंजनगावसुर्जी तालुक्यातील कोकर्डा फाटा, तिवसा तालुक्यातील वरुडा व धामणगावरेल्वे तालुक्यातील देवगाव येथे वीज कोसळण्याच्या घटना घडल्या. रोशनी नरेश मंडवे (वय २१, रा. बुधवारा, अंजनगावसुर्जी), श्याम निरंजन शिंदे (वय १४, रा. वरुडा) व आयुष राजू इंगळकर (वय १४, रा. देवगाव), अशी मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. तर कोकर्डा फाट्यावरील घटनेत नरेश दादाराव मंडवे (वय २५, रा. बुधवारा, अंजनगावसुर्जी) व त्यांची मेहुणी वृषाली आनंद इंगळे (वय १८, रा. अंजनगावसुर्जी) हे जखमी आहेत. देवगावात वीज कोसळल्याने उमेश सुधाकर चौधरी (वय १६, रा. देवगाव) हा गंभीर जखमी झाला.
नागपूर : सावनेर तालुक्यातील चनकापूर रिजनल वर्क शॉप येथे वीज पडल्याने २६ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. प्रफुल्ल दीपक नाईक (रा. वाघोडा) आणि त्याचा सहकारी शिवप्रकाश बाबुलाल कैथल (रा. चनकापूर) दोघेही झाडाखाली खुर्चीवर बसले होते. दुपारी १च्या सुमारास झाडावर वीज कोसळली. यात प्रफुल्लचा जागीच मृत्यू झाला. शिवप्रकाश गंभीर जखमी झाला. तसेच कुही तालुक्यातील पचखेडी येथील राज रामलाल ठाकरे (वय ११) या मुलाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडली. राज हा शेतात गेला असता ही दुर्दैवी घटना घडली.
भंडारा : जेवनाळा परिसरात गुरुवार (ता. २३) गुरुवारी दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, घोडेझरी येथे वीज पडून सतीश सिंगनजुडे यांच्या गायीचा मृत्यू झाला आहे. तसेच सिहोरा परिसरात दुपारी वीज कोसळून परसवाडा येथील पराग शांताराम मोरे यांच्या दोन म्हशींचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. यात त्यांचे एक लाखापेक्षा जास्त नुकसान झाले.
पवनने दिली होती सीआरपीएफची परीक्षा
काही दिवसांपूर्वी पवन गुढेवार याने सीआरपीएफची परीक्षा दिली होती. तो शारीरिक क्षमता परीक्षादेखील उत्तीर्ण झाला होता. फक्त वैद्यकीय परीक्षा शिल्लक होती. शुक्रवारी रेल्वे विभागाची परीक्षा द्यायला तो नागपूरला जाणार होता. पवन अविवाहित होता.

Leave a Reply