भाजपचा महाविकास आघाडीच्या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न – नाना पटोले

मुंबई : १९ जून – येत्या २० तारखेला महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. दहा जागांसाठी ही निवडणूक होणार असून एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही चुरस पाहायला मिळणार आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीकडून मतांची जुळवाजुळव केली जात आहे. विधान परिषदेत गुप्त पद्धतीने मतदान होणार असल्याने राज्यातील सर्वच पक्ष सावध झाले आहेत.
असं असताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळजनक विधान केलं आहे. भारतीय जनता पार्टीकडून महाविकास आघाडीच्या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अगदी त्याच पद्धतीचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून देखील केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोले यांनी शनिवारी सांगितलं की, “आजच्या बैठकीत विधान परिषद निवडणुकीबाबतची रणनीती तयार झाली. २० तारखेला होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील, अशी तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी (१९ जून) देखील महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. समन्वय साधून निवडणूक लढवली जाते, त्यामुळे रविवारीही महाविकास आघाडीची बैठक आहे. यात पुन्हा काही रणनीती तयार केली जाईल. यावेळी काही अडथळा येणार नाही, असं मला वाटतं,” असंही ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “ज्या पद्धतीने भाजपा महाविकास आघाडीच्या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. तसाच प्रयत्न महाविकास आघाडीकडून त्यांच्या आमदारांसोबत केला जात आहे. उद्यापर्यंत त्याबाबत तपशील मिळेल.” असंही ते म्हणाले
खरंतर, राज्यसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे महाविकास आघाडीकडून यावेळी खबरदारी घेतली जात आहे. आघाडीच्या तिन्ही पक्षांनी आपले आमदार तीन वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवले आहेत. येथे आमदारांना मतदानाची प्रक्रिया समजावून सांगितली जात असून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून मार्गदर्शन केलं जात आहे.

Leave a Reply