१०वी, १२वीच्या पुरवणी परीक्षांची तारीख जाहीर

मुंबई : १७ जून – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ९६.९४ टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेत. ३.०६ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण देखील झालेत. त्यामुळेच मंडळाने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेच्या तारखांचीही घोषणा केलीय. यानुसार १२ वीची पुरवणी परीक्षा २१ जुलै २०२२ रोजी, तर १० वीची पुरवणी परीक्षा २७ जुलै २०२२ रोजी होणार आहे. मंडळाने दहावी निकालाची घोषणा करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेतच ही माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, “१२ वीची पुरवणी परीक्षा २१ जुलैपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होईल. १० वीची पुरवणी परीक्षा २७ जुलैला सुरू होईल. ही परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या दरम्यान घेण्यात येईल.”
“१२ वीचे अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली आहे, तर १० वीचे अर्ज २० जूनपासून घेण्यास सुरुवात करणार आहे,” असंही मंडळाने नमूद केलं.
दहावीच्या परीक्षेत ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
दहावी परीक्षेसाठी ९ विभागातून एकूण १५ लाख ८४ हजार नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १५ लाख २१ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.९४ टक्के आहे.
राज्यात एकूण १२२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले, तर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८३,०६० इतकी आहे.
पुन्हा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७९.०६ टक्के उत्तीर्ण
राज्यातील ९ विभागातून एकूण ५४ हजार १५९ विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा देण्यासाठी (रिपीटर) नोंदणी केली. त्यापैकी ५२ हजार ३५१ विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेला बसले. त्यापैकी ४१ हजार ३९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ७९.०६ आहे.
उत्तीर्णतेच्या टक्केवारीत कोकण विभाग अव्वल, तर नाशिक विभाग सर्वात मागे
कोकण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे ९९.२७ टक्के इतकी आहे. सर्वात कमी उत्तीर्णतेची टक्केवारी नाशिक विभागाची ९५.९० टक्के इतकी आहे.

Leave a Reply