संपादकीय संवाद – संजय राऊत यांच्या वायफळ बडबडीला जनता कंटाळली

राज्यसभा निवडणुकीचे निकाल लागून ४८ तास उलटले तरी निकालाचे कवित्व अद्यापही सुरूच आहेत, विशेष म्हणजे शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजयभाऊ राऊत यांना हा पराभव फारच झोंबला आहे, त्यात त्यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर आरोप करणे सुरु ठेवले आहे.
जेव्हापासून महाराष्ट्रात महाआघाडीच्या सरकार आले, तेव्हापासून केंद्र सरकार केंद्रीय तपासयंत्रणांचा उपयोग करून राज्य सरकार खिळखिळे करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संजय राऊत दरदिवसाआड करत असतात, हा आरोप केला नाही तर त्यांना जेवण पचत नसावे, असे वाटू लागले आहे. काल त्यांनी दावा केला की ४८ तास ईडी ही तपासयंत्रणा आमच्या ताब्यात दिली तर देवेंद्र फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील, त्यांचा हा दावा अतिशय हास्यास्पद असाच म्हणावा लागेल.
कोणत्याही तपासयंत्रणेवर कितीही दबाव आणला, तरी काहीतरी तथ्य असल्याशिवाय कुणावर कारवाई करता येत नाही, ज्या प्रमाणे महाआघाडी विरोधकांच्या हातात केंद्रीय तपासयंत्रणा आहेत, त्याचप्रमाणे सत्ताधारी महाआघाडीच्या हातात राज्याच्या तपासयंत्रणा आहेत. कुणाही विरुद्ध कारवाई करायची तर त्या प्रकरणात काहीतरी दम असावा लागतो, महाआघाडीच्या मंत्र्यांनी अर्णब गोस्वामी, नारायण राणे, नितेश राणे या व्यक्तींवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला, रवी आणि नवनीत राणांना तुरुंगात डांबुनही पहिले, मात्र न्यायालयाने सर्वच प्रकरण खारीज केली. त्याचवेळी अनिल देशमुख, नवाब मलिक, सचिन वाझे यांच्याविरोधात असलेल्या प्रकरणात तथ्य आढळल्याने त्यांना जामीन देखील मिळू शकलेला नाही. जर संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे ईडीचा गैरवापर करता आला असता, तर भाजपने सर्व सहाच्या सहा जागी भाजपचे उमेदवार निवडून आणले असते. मात्र तसे होत नाही, यावरूनच नेमकी परिस्थिती लक्षात येते.
इथे आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा, ४८ तासासाठी ईडीचा कारभार संजय राऊत यांच्याकडे सोपवलाही तरी त्या ४८ तासांत निवडणूक राहणार आहे काय? निवडणूक असली तरी तिथे देवेंद्र फडणवीस मतदार राहणार आहेत काय? म्हणजेच निवडणूक २४ तासावर आली की ईडीचा कारभार संजय राऊत यांच्याकडे सोपवायचा आणि देवेंद्र फडणवीसांचे मत टाकून झाले कि तो कारभार परत मूळ अधिकाऱ्यांकडे सोपवायचा असा प्रकार करावा लागेल. हा द्राविडी प्राणायाम अशक्यकोटीतील आहे.
हे सर्व मुद्दे लक्षात घेता संजय राऊत यांचा दावा म्हणजे वायफळ बडबड इतकेच म्हणता येईल. भारतीय जनता पक्षाशी धोकेबाजी करून सत्ता मिळवली हे उघडे गुपित सर्वप्रथम अजय राऊत यांनाच कळले होते, त्यामुळेच ते अति आक्रमकपणे भाजपवर टीका करत राहिलेले आहेत. आता त्यांच्या टीकेलाही ताळतंत्र राहिलेला नाही, तोंडाला येईल ते बोलत सुटायचे आणि आपलेच खरे असल्याचा कांगावा करायचा हा त्यांचा प्रकार दैनंदिन स्तरावर सुरु आहे.
असे असले तरी महाराष्ट्रातील जनता मात्र या वायफळ बडबडीला कंटाळलेली आहेत, हे जर असेच सुरु राहिले तर त्याचे दृश्य परिणाम लवकरच दिसू लागतील. हा धोका सर्वच संबंधितांनी लक्षात घ्यायला हवा.

अविनाश पाठक

Leave a Reply