दीर्घकाळ सत्ता उपभोगणाऱ्यांनी आदिवासी प्रदेशांच्या विकासाला प्राधान्य दिले नाही – पंतप्रधान

अहमदाबाद : ११ जून – ‘‘दीर्घ काळ देशाची सत्ता उपभोगणाऱ्यांनी आदिवासी प्रदेशांच्या विकासास प्राधान्य दिले नाही,’’अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागातील खुदवेल गावात ‘गुजरात गौरव अभियान’ सभेत ते बोलत होते. यावेळी मोदींनी आदिवासी भागाच्या विकासासाठी तीन हजार ५० कोटींच्या योजनांचा प्रारंभ केला.
गुजरातमध्ये या वर्षांखेरीस निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले, की आदिवासी विकासकार्याची सुरुवात मते मिळवणे किंवा निवडणुका जिंकण्यासाठी केलेली नसून, आदिवासींच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ही विकासकार्ये करत आहोत. यावेळी कुणाचेही नाव न घेता टीका करताना मोदी म्हणाले, की ज्यांनी देशांत दीर्घकाळ सत्तास्थाने उपभोगली, त्यांनी कधीही आदिवासी भागाच्या विकासास प्राधान्य दिले नाही. कारण त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. आधी आदिवासी भागांत चांगले रस्तेसुद्धा नसायचे. आधी आदिवासी, दुर्गम भागापर्यंत लसीकरण मोहीम पोहोचवण्यासाठी सरकारला अनेक वर्षे लागत. तुलनेने शहरी भागात या मोहिमा लवकर पूर्ण होत. वनांमध्ये राहणाऱ्यांना वंचित ठेवले जाई. मात्र, कोविड लसीकरण मोहिमेत आम्ही आदिवासींच्या लसीकरणासाठी विशेष प्राधान्य दिले. एका रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी मोदी म्हणाले, की गुजरातमधील अनुभवांचा देशाचे आरोग्य धोरण ठरवताना मला उपयोग झाला. गुजरातमधील माझ्या ‘मुख्यमंत्री अमृतम योजने’च्या धर्तीवर केंद्रात ‘आयुष्मान भारत योजना’ सुरू केली. या अंतर्गत गरिबांना उपचारांसाठी पाच लाखांची मदत मिळते.

Leave a Reply