बस घाटाजवळ थांबवून एसटीच्या वाहकाने घाटात उडी घेत केली आत्महत्या

मुंबई : ९ जून – कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर माळशेज घाटात राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणहून निघालेली अकोले आगारात जाणारी बस माळशेज घाटात येताच वाहकाने बस थांबवून थेट दरीत उडी घेतली. गणपत इडे असे या वाहकाचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी टोकावडे पोलीस अधिक तपास करत आहेत.
राज्य परिवहन महामंडळाची अकोले आगाराची बस बुधवारी दुपारी कल्याण आगारातून अकोलेला जाण्यासाठी निघाली होती. या बसमध्ये गणपत इडे वाहक म्हणून कार्यरत होते. बुधवारी दुपारच्या सुमारास एसटी बस माळशेज घाटात आली असताना वाहक गणपत इडे यांनी अचानक बस थांबवली. बस थांबताच त्यांनी बसमधून उतरून थेट दरीत उडी घेतली.
घटनेची माहिती टोकावडे पोलिसांना मिळताच पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने गणपत इडे यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरीत काही अंतरावर इडे यांचा मृतदेह सापडला. वाहकाचा मृतदेह शोधून शव विच्छेदन करण्यासाठी मुरबाड मधील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला. इडे यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध आता पोलीस घेत आहेत. इडे भंडारदरा येथील रहिवासी होते. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply