आ. अभिजित वंजारी यांच्याविरोधात आ. कृष्णा खोपडेंची पोलीस तक्रार

नागपूर : ८ जून – पूर्व नागपूर मतदारसंघाचे आ. कृष्णा खोपडे यांनी काँग्रेसचे आ. अभिजित वंजारी यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली आहे. आ. वंजारी यांनी कृष्णा खोपडे यांनी लावलेल्या बेंचेसवरील नाव मिटवत स्वत:चे नाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा खोपडे यांनी दावा केला आहे की, ज्या बेंचेसवर आ. अभिजित वंजारी यांचे नाव आहे ते आ. कृष्णा खोपडे यांनी त्यांच्या आमदार निधीतून लावले आहे. हे नाव मिटवत अभिजित वंजारी यांनी त्यांचे नाव बदलल्याचा आरोप त्यांचा आहे. या प्रकरणी झोनचे राजूरकर कंत्राटदार यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी खोपडे यांनी तक्रारीतून केली आहे. प्रेमनगर व शांतीनगर या भागात शासकीय आमदार निधीतून नागरिकांसाठी बसण्याकरिता लोखंडी बेंचेस मोठय़ा प्रमाणात लावण्यात आलेले आहे. या बेंचेसवरील नाव मिटवत अभिजित वंजारी यांचे नाव टाकण्याकरिता सतरंजीपुरा झोनचे अधिकारी राजूरकर यांनी कंत्राटदाराला आदेश दिल्याचा दावा खोपडे यांनी केला आहे. नाव बदलत असताना तुषार ठाकरे नावाच्या व्यक्तीने त्यांना पकडले. तसे कळल्यानंतर खोपडे यांनी कंत्राटदाराशी संपर्क साधला असता राजूरकर यांनी सर्वच बेंचेसला पेंट मारण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. परंतु, असे काम करण्याचे कंत्राट दिले नसल्याचेही त्याने सांगितल्याचा आरोप खोपडे यांनी केला आहे. अशाप्रकारे बेकायदेशीरपणे कोणाचीही परवानगी नसताना अधिकार्यांनी कंत्राटदाराला कोणत्या अधिकारात पेंट मारण्यास सांगितले. ज्यामुळे बेंचेसवरील नाव मिटविण्यात येत आहे. याचा अर्थ बोगस बिल काढणे हे यावरून दिसून येत असल्याचाही आरोप खोपडे यांचा आहे. या कंत्राटदारावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी खोपडे यांनी केली आहे

Leave a Reply