अमरावती अकोला महामार्गावर सर्वात लांब रस्त्याच्या अखंड निर्मितीचा बनणार विश्वविक्रम ?

अमरावती : ३ जून – भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त अमरावती अकोला या राष्ट्रीय महामार्गावर प्रथमच बिटूमिनस काँक्रीटच्या सर्वात लांब रस्त्याची अखंडपणे निर्मितीचा विश्वविक्रम नोंदविला जाणार आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून या विश्वविक्रमी कामाला सुरुवात झाली आहे. हे काम सलग 110 तासात 75 किलोमीटरपर्यंत लोणी ते माना या गावापर्यंत हा विक्रम नोंदविला जाणार आहे.
अमरावती ते अकोला हा महामार्ग मागील दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून अतिशय खराब होता. या मार्गाचे काम यापूर्वी तीन कंपन्यांना देण्यात आले होते, मात्र हे काम सतत रखडल्यामुळे या मार्गाऐवजी अमरावती ते अकोला प्रवास नागरिक दोन वर्षांपासून दर्यापूर मार्गे बनलेल्या उत्कृष्ट रस्त्यावरून करत होते. मात्र राष्ट्रीय महामार्ग असणाऱ्या अमरावती अकोला मार्गावरून एसटी बससह अनेक ट्रक व खासगी गाड्या धावत होत्या. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरुन तारेवरची कसरत होती. महाराष्ट्रातील अतिशय खराब रस्ता म्हणून ओळख असणारा अमरावती अकोला हा मार्ग आता विक्रमी नोंद करून उत्कृष्ट होतो आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर अमरावती ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली दरम्यान एकूण चार टप्प्यात काम सुरु झाले आहे. त्यापैकी अमरावती ते अकोला दरम्यान कामाची गती अतिशय मंदावली असल्याने, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हा मार्ग दहा वर्षांपासून रखडला आहे. यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून विक्रमी वेगात या मार्गाच्या चारही टप्प्याचे काम हाती घेतले आहे.
सर्वाधिक वेगाने 22 किलोमीटरचा मार्ग तयार करण्याचा विक्रम कतार देशात नोंदविला गेला आहे. अमरावती अकोला मार्गावर सुरू असलेले काम हे कतार येथील विश्वविक्रमाला मागे टाकणार आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी सुद्धा अमरावतीत दाखल झाले आहे. 7 जून रोजी सायंकाळी सात वाजता हा विक्रम पूर्ण होईल, तेव्हा लंडन येथून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम या मार्गावर पोहोचणार असल्याची, माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक व्यवस्थापक राजू अग्रवाल यांनी दिली.

Leave a Reply