आय पी एल नको आय पी डी एल हवे देशाला – डॉ विजय पांढरीपांडे

सध्याIPL चा धमाका चालू आहे.या एका खेळाने भारतीयांना वेड लावले आहे.इंग्रज गेलेत देश सोडून.पण आपल्याला काही सवयी लावून गेलेत.त्या चांगल्या का वाईट हे ज्याचे त्याने ठरवायचे.पण या क्रिकेट वेडाने आपले अनेक मनुष्य तास खर्ची गेलेत हे मात्र खरे.आधी पाच दिवसांची टेस्ट,मग ट्वेंटी ट्वेंटी,आता आय पी एल,खेळाचे अक्षरशः व्यापारीकरण झाले.खेळाडू श्रीमंत झाले.आयोजकांचे गल्ले भरले. बोर्डा वरच्या सभासदांनी,वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.च्यानल वाल्यांनी लुटले.सरकार बघत बसले!मॅच चालू असताना वेड लागल्या सारखी मंडळी टी वी च्या पडद्याला चिकटून बसतात कामधाम सोडून.त्यातील अनेकांना अनेक गोष्टी कळत नाहीत.लेग स्पिन,गुगली,ऑफ साईड,नो बॉल,पॉवर प्ले,यातले बरेच काय ते कळत नाही.आता तर तोकड्या पोषाखातल्या मुली समालोचकाबरोबर दिसतात..शिवाय चीयरगर्ल्सदेखील! यात समाजाचा लाखो करोडो रुपयांचा चुरा होतो.आपल्या हाती काय येते?क्रीडा क्षेत्रात कुणाला काय लाभमिळाले?असे बरेच अनुत्तरीत प्रश्न मनात येतात.
आज आपल्या देशाला इतर अनेक क्षेत्रात लक्ष घालण्याची गरज आहे.आपली गणना प्रगत देशात होत नाही.शिक्षण,आरोग्य,कृषी,अशा अनेक बाबतीत आपण अनेक देशांच्या तुलनेत मागे आहोत.मूलभूत विज्ञान तंत्रज्ञान,संशोधन या बाबतीत इतर अनेक देश,अगदी छोटे देश आपल्या कितीतरी पुढे आहेत.त्यासाठी आपल्याला अनेक मैलाचे अंतर चालावे लागणार आहे. पण आपण आपली शक्ती भलतीकडेच खर्ची घालतो आहोत.आपण दावे करतो:आमच्याकडे प्रतिभा आहे, सज्ञान तरुण पिढी आहे, उज्ज्वल परंपरा आहे,आम्ही बरेच शोध आधीच लावून ठेवले आहेत,सारे ज्ञान,विज्ञान,तंत्रज्ञान इथे आधी पासून होते वेड पुराणात,शास्त्र ग्रंथात..मग त्याचा उपयोग जगासाठी सोडा,आपल्याच देशासाठी का होत नाहीय. आपण अनेक गोष्टी,वस्तू आयात करतो?आपण कुठले मूलभूत विज्ञान,तंत्रज्ञान,संशोधन जगासाठी निर्यात करतो?अजूनही आपण पूर्णतः स्वावलंबी का नाही? आत्मनिर्भर भारत च्या घोषणा का द्याव्या लागतात अजूनही?
ही परिस्थिती बदलायला हवी.त्यासाठी आय पी एल च्या धर्ती वर काही नवा प्रयोग करता येईल.क्रिकेट सारख्या खेळात फालतू रेव्हेण्यू ,मनुष्यतास वाया घालवण्या ऐवजी विज्ञान तंत्रज्ञान देशातच विकसित करण्यासाठी काही योजना कार्यान्वित करता येईल.त्यासाठी तरुण पिढीला प्रवृत्त करता येईल,प्रोत्साहन देता येईल.अगदी आय पी एल च्याच धर्तीवर हे करता येईल.
याला आपण इंडियन रिसर्च टॅलेंट सर्च (IRTS)म्हणू या. दुसरेही चांगले नाव देता येईल.भारतीय शोध निर्माण प्रयोगशाळा असे काहीसे..त्यासाठी आधी सरकारने देशाला ज्या क्षेत्रात संशोधनाची,तंत्रज्ञान विकसित करण्याची आद्य गरज आहे,ती कार्य क्षेत्रे निश्चित करावी.उदा शेती उद्योग, शिक्षण,हेल्थ केअर,पर्यावरण सवर्धन,उर्जा,कुपोषण,वाढती लोकसंख्या,दळणवळण,गरीबी निर्मूलन,सामाजिक न्याय.. असे प्राथमिक कार्य क्षेत्र निश्चित करता येतील.या प्रत्येक क्षेत्रात्तील विविध राज्याच्या प्राथमिक गरजा निश्चित कराव्या लागतील.अन् त्या त्या क्षेत्रात मूलभूत संशोधन,तंत्रज्ञान, प्रोडक्ट विकसित करण्या चे आव्हान द्यावे लागेल तरुणाईला.मुला मुलींनी स्वतंत्र किंवा बहुताशी एकत्रित येऊन हे विज्ञान तंत्रज्ञान विकसित करायचे.तेही ठराविक कालावधीत.त्यासाठी लागणारा निधी सरकारने,उद्योजक,प्रायोजक यांनी मिळून उपलब्ध करून द्यायचा.म्हणजे जे प्रपोजल येतील विकसना साठी येतील, त्यांची योग्यता ,फिजिबिलिटी तपासावी लागेल.ती तपासताना,अपयश,चुका हे गृहितक स्वीकारावे लागेल.यशाच्या आधी अपयशाच्या पायऱ्या असतातच नव निर्मितीच्या वाटेवर.एडिसन ने बल्ब चा शोध लावण्या पूर्वी डझनभर फिलामेंट वाया गेले होते. लित्झ माईटनर हिलाही खूप अपयश आले संशोधन करतांना.पण यातून तरुण वर्गात नवी चेतना,प्रेरणा जागेल. सहकार्याची भावना वाढेल.विज्ञाना प्रती उत्सुकता वाढेल.आपल्या संविधानात देखील विज्ञानाचे संवर्धन करणे, विज्ञानभाव जोपासणे यावर भर दिलाय.पण आपण त्याकडे दुर्लक्ष केले.
संशोधन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असते.चुका करीतच पुढे जायचे असते.नवे काही शोधण्या आधी नेमकी गरज काय,याआधी कुणी काय केले,त्यात काय चुकले,किंवा त्यांच्या काही मर्यादा आहेत का,तिथून पुढे कसे जायचे,चुका करीत,चुका टाळीत मार्ग आक्रमण कसे करायचे..हा सगळा अभ्यास चिकाटीने करावा लागेल.हे संशोधन फक्त एकेडेमिक स्वरूपाचे ,विद्यापीठात चालते तसे धूळ खात पडलेल्या प्रबंधात असते ,तसे नसावे..ते समाजाला उपयोगी हवे.मनुष्याचे दैनंदिन जीवनमान सुधारणारे ,अधिक सुसह्य करणारे हवे.मागे मुंबईच्या डबे वाल्याच्या डोक्यावरचे ओझे हलके करणारे संशोधन एका शाळकरी मुलीने केल्याचे वाचले होते.नुकतेच बारामतीच्या तिशीच्या आतील एका तरुण मुलीने आर्थिक क्षेत्रात अभ्यास करून करोडोचा नवा उद्योग उभारला आहे लंडन येथे.शेती च्या क्षेत्रात लागणारेछोटेमोठे तंत्र काही न शिकलेल्या तरुणांनी विकसित केल्याचे आपण वाचले आहे.हे सारे अधिक प्रमाणात,अधिक शिस्तबध्द पद्धतीने,योजनापूर्वक व्हायला हवे.दात आहेत पण चणे नाहीत असे व्हायला नको.ज्याचे श्रेय त्याला मिळायला हवे.या प्रयोगातून जे संशोधन यशस्वी होईल,मान्यता प्राप्त होईल ते विकसित करायला उद्योजकांना पुढे यावे लागेल.सरकारला मदत करावी लागेल.कोविद व्याक्सिन निर्मिती च्या वेळी हे घडले.पेटंट, कॉपी राईट चे नियम आहेत.त्यानुसार ज्याचे श्रेय त्यांना मिळेल.तरुणाईला शिक्षणाचा खरा अर्थ कळेल.शिक्षण हे समस्यांचा शोध घेत घेत जाते. प्रश्न निर्माण केल्याने घडते. प्रश्न निर्माण करणार्याना उत्तरे शोधण्याचा अधिकार मिळतो.
स्पर्धेने चुरस निर्माण होते.विज्ञान तंत्रज्ञान स्वदेशीच विकसित करण्यासाठी अशा आय पी एल सारख्या स्पर्धा तरुण पिढीत ज्ञानार्जनाचा खऱ्या अर्थाने विकास करतील.विकसित झालेले हे प्रयोग,तंत्रज्ञान भारतीयच नव्हे तर परदेशी तज्ञा कडून तपासून घेता येतील.त्यातून नवे उद्योग निर्माण होतील.नोकऱ्या द्या म्हणणारा लाचार तरुणवर्ग निर्माण होण्या ऐवजी नोकऱ्या देणारा स्वतःच्या पायावर उभे राहणारा उद्योजक वर्ग निर्माण होईल.हीच नवी ज्ञान साधना करणारी पिढी आपल्या देशाला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करण्यास सहाय्यभूत ठरेल.
आय पी एल च्यागटारामध्ये वाहणारी गंगा या आय पी डी एल म्हणजे इंडियन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट लीग मध्ये वळती झाली तर आपल्या देशाचे चित्रच बदलून जाईल. टी वी च्या पडद्याला चिकटून आय पी एल बघण्यात मौलिक वेळ वाया घालवणारा तरुण वर्ग नाव निर्मिती साठी प्रेरित होईल.हे कठीण वाटले तरी अशक्य नाही. काही वैज्ञानिक,संशोधक,उद्योजक,सरकारी अधिकारी , शिक्षण तज्ञ एकत्र बसून विचार मंथनातून असे नव निर्मितीला,नव संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या प्रकल्पाची धोरण आखणी सहज करू शकतात.मला खात्री आहे.यातली गुंतवणूक वाया जाणार नाही. चार दशके विद्यार्थ्याच्या सहवासात राहिल्याने त्यांच्यावर तेव्हढा विश्वास निश्चितच आहे.

डॉ विजय पांढरीपांडे

Leave a Reply