दारावर उभा असलेल्या खासगी बसवाहकाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

नागपूर : ३० मे – खासगी बसच्या दारात उभे राहून डोके बाहेर काढणे एका बसवाहकाच्या जीवावर बेतले. चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकने खासगी बसला धडक दिल्यानंतर दारात उभा असलेल्या वाहकाचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. कपिलनगर हद्दीत कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौकात घडली.
नीरज मोतीलाल प्रजापती असे मृत २२ वर्षीय वाहकाचे नाव आहे. तो गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील सरांडी येथील रहिवासी होता. बसचालकाचे नाव नीलेश्वर भुरे (३७) आहे. बसचालक भुरे हे सरांडी येथील अमोल जयस्वाल यांच्या मालकीच्या रामकिशन ट्रॅव्हल्सच्या बसवर चालक म्हणून काम करतात. शनिवारी रात्री मोहाडी येथील दिलीप लांजेवार यांच्या कुटुंबातील लग्न ऑटोमोटिव्ह चौकातील केएमसी लॉन येथे होते. रात्री ८ च्या सुमारास भुरे यांनी बसमधून वर्हाड्यांना विवाहस्थळी आणले. रात्री एकच्या सुमारास भुरे यांनी वर्हाड्यांना बसमध्ये बसवले आणि मोहाडीकडे निघाले. दरम्यान, बसचालकाला रस्ता दाखवण्यासाठी नीरज डोकं बाहेर काढून दारात उभा होता. याचवेळी चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकने अतिशय वेगात बसला डाव्या बाजूने धडक दिली. हा अपघात घडताच दारात उभा असलेला नीरज खाली पडला आणि ट्रकच्या मागील चाकात सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करीत ट्रकचालक धर्मपाल लक्ष्मण गुर्जर (वय २६, टहला, जि. महेंद्रगड, हरियाणा) याला अटक केली.

Leave a Reply