काॅंगेसचा ‘प्रताप’गड – विनोद देशमुख

काॅंगेसच्या नेतृत्वाचे डोके ठिकाणावर आहे काय, असा प्रश्न राज्यसभेचे उमेदवारह पाहून कोणालाही पडावा. कारण तसेच आहे. महाराष्ट्राचे असलेले मुकुल वासनिक यांना राजस्थानातून तिकीट आणि कोण कुठला इम्रान प्रतापगडी महाराष्ट्रातून उमेदवार ! हा काय प्रकार आहे ? डोके सुन्न करणाराच हा निर्णय म्हटला पाहिजे.
मुकुल वासनिक विदर्भाचे. लोकसभेत खासदारही होते. त्यांना सोडून इम्रानला आयात का करण्यात आले, असा प्रश्न संतप्त काॅंग्रेसजनच विचारत आहेत. हे कुठले राजकारण आहे ? वास्तविक, राज्यसभेची निर्मिती राज्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी झाली आहे. परंतु, बहुतांश राजकीय पक्षांनी हा संकेत धाब्यावर बसवून या राज्याचा माणूस त्या राज्यातून राज्यसभेवर, असे सोयीचे राजकारण चालविले आहे. नजमा हेपतुल्ला, पी. चिदंबरम् वगैरे लोक चक्क महाराष्ट्रातून राज्यसभा सदस्य होते. सर्वात कहर म्हणजे, सलग दहा वर्षे पंतप्रधान राहिलेले डाॅ. मनमोहनसिंग आसाममधून राज्यसभेवर निवडून जात. त्यांच्यासाठी गुवाहाटीत एक घर भाड्याने घेऊन त्यांच्या नावाची पाटी तेवढी लावण्यात आली होती. तेथील मतदारयादीत त्यांचे नावही नोंदविण्यात आले होते. ते आसामचे रहिवासी असल्याचे दाखविण्यासाठीचा खटाटोप !
हेच आता इम्रानसाठी महाराष्ट्रात, म्हणजेच मुंबईत केले जाणार. का, तर पक्षश्रेष्ठींनी त्यांची उमेदवारी लादली म्हणून ! मुळात इम्रान उत्तर प्रदेशचे, प्रतापगडचे. ते शायर म्हणून प्रतापगडी असे नाव लावतात.त्यांचे खरे नाव आहे मोहम्मद इम्रान खान. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते मोरादाबादहून काॅंग्रेसचे उमेदवार होते आणि सपाच्या एस. टी. हसनकडून 5 लाख 90 हजारांनी सपाटून पराभूत झाले. (विक्रमी पराभव !) दोन वर्षांनी याच इम्रानला काॅंग्रेसने अल्पसंख्यांक सेलचा राष्ट्रीय प्रमुख नेमले. कारण काय, तर प्रियांका गांधीशी असलेली जवळिक ! उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारात इम्रानने प्रियांकाला भरपूर मदत केली. त्याचेच बक्षीस म्हणून राज्यसभेचे हे तिकीट ! पण ते नेमके महाराष्ट्रातून का अन् तेही आमचे मुकुल वासनिक यादीत असताना, त्यांना डावलून आणि राजस्थानात पाठवून इम्रान महाराष्ट्रावर लादणे का, असे प्रश्न निर्माण झालेले आहेत.
आधीच महाराष्ट्राचे जनमानस राज्यातील सत्ताधाऱ्यांवर (ज्यात काॅंग्रेसची भागीदारी एकतृतीयांश) नाराज आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण, औरंगाबादचे नामांतर, भोंगे, हनुमान चालिसा यासारख्या प्रकरणांनी राज्यातील वातावरण तापलेले आहे. असे असताना इम्रान प्रतापगडीची उमेदवारी देऊन काॅंग़्रेसने एकप्रकारे महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम केले, असे म्हणता येऊ शकते. भाजपाने थोडे काही केले की लगेच “महाराष्ट्राचा अपमान” असा थयथयाट करणारे संजय राऊत कुठे आहेत आता ? परप्रांतातला एक खराखुरा खान काॅंग्रेसने महाराष्ट्रावर सोडला, हा अवमान नाही का ? हेच का तुमचे अस्सल हिंदुत्व ? की, इम्रानच्या नावातील प्रतापगडी शब्द पाहून थंड झाले साहेब ! स्वत:च्या छत्रपतींशी दगा आणि बाहेरच्या खानासाठी पायघड्या, हेच यापुढे  शिवसेनेचे प्राक्तन राहणार, असे महाराष्ट्रातील जनतेचे मत बनले, तर त्यांना दोष देता येईल का ? शिव… शिव… शिव… सत्ता टिकविण्यासाठी किती हा कडेलोट ! किती लोटांगण !! अन् किती अगतिकता !!!

विनोद देशमुख

Leave a Reply