रणनीतीत बदल न केल्यास देशात १ ऑगस्टपर्यंत १० लाख मृत्यू होतील – लॅन्सेटचा दावा

नवी दिल्ली : ९ मे – भारताने कोरोनाविरुद्ध लढण्याच्या रणनीतीत बदल न केल्यास येत्या १ ऑगस्टपर्यंत देशातील १० लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होईल, असा गंभीर इशारा लॅन्सेट या आरोग्य नियतकालिकाने दिला आहे. भारताने सुरुवातीच्या काळात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले होते. मात्र, त्यानंतर एप्रिल महिन्यापर्यंत केंद्र सरकारने नेमलेल्या कोव्हिड टास्क फोर्सची बैठकच झाली नाही. त्यामुळे आता देशात १० लाख मृत्यू झाल्यास त्या राष्ट्रीय आपत्तीला मोदी सरकार जबाबदार असेल, असे ‘लॅन्सेट’च्या संपादकीय लेखात म्हटले आहे.
गेल्या 24 तासांत देशभरा पुन्हा एकदा कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 4 लाख 3 हजार 738 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 92 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींचा उच्चांक आहे.
आतापर्यंत देशात 1 कोटी 83 लाख 17 हजार 404 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 22 लाख 96 हजार 414 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 42 हजार 362 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 37 लाख 36 हजार 648 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
गेल्या महिन्यात कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आलेल्या उत्तराखंडमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 24 तासांत उत्तराखंडमध्ये कोरोनाचे 8,390 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 118 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडच्या 9 जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 27 टक्क्यांनी वाढली आहे.

Leave a Reply