तेंदूपत्ता संकलनाला गेलेल्या पती-पत्नी वाघाच्या हल्ल्यात ठार

चंद्रपूर : २५ मे – जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाने हल्ला केला. यात पत्नीला वाघाने ठार केले. पतीला फरफटत जंगलात नेले. ही घटना चिमूर तालुक्यातील केवाडा-गोंदाडा जंगलात आज दुपारी घडली. पतीचा अद्याप शोध लागला नाही. त्याचा वनविभाग आणि गावकरी शोध घेत आहे. पत्नीचे नाव मीना जांभूळकर असे आहे.
तेंदुपत्ता आणण्यासाठी गेले होते जंगलात – सध्या तेंदुपत्ता संकलनाचा हंगाम सुरू आहे. शेतीची काम अजूनही सुरू झाली नाही. त्यामुळे गावखेड्यातील महिला, पुरुष, युवक, युवती जंगलात तेंदुपत्ता संकलनासाठी जातात. तालुक्यातील केवाडा येथील विकास जांभुळकर आणि पत्नी मीना जांभुळकर हे दोघेही सकाळच्या सुमारास केवाडा- गोंदेडा जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेले होते.
तेंदुपत्ता संकलित करीत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने दोघांवरही हल्ला केला. बराच वेळ लोटून जांभुळकर दाम्पत्य घरी परतले नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरचे आणि आजूबाजूच्या नागरिकांनी जंगल गाठत शोधमोहीम सुरू केली. केवाडा-गोंदेडा जंगलात पत्नी मीना जांभुळकरचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, यावेळी त्यांना पत्नीचा मृतदेह मिळाला. मात्र, पती विकास हा परिसरात कुठेच आढळून आला नाही. त्यामुळे त्याच्यावरही वाघाने हल्ला करून फरफटत जंगलात नेल्याची शंका वनविभागाला आहे. त्यामुळे गावकरी आणि वनविभागाने विकासचा शोध घेणे सुरू केले. अद्याप त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता. दरम्यान, वनविभागाने जांभूळकर परिवाराला तातडीने पंचेवीस हजारांची मदत दिली आहे.

Leave a Reply