त्या दिवशी सगळ्यांचे बीपी २०० च्या वर शूटअप झाले असते – केतकी चितळे

मुंबई : २५ मे – अभिनेत्री केतकी चितळेला मंगळवारी सात जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. २०२० मध्ये बौद्ध धर्माविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केतकीवर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने पूर्वी तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. याच प्रकरणामध्ये मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या सुनावणीनंतर ठाण्यामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी केतकीला आणलं असता तिने प्रसारमाध्यमांनी मोजक्या शब्दांमध्ये संवाद साधला. यावेळी केतकीने ज्या दिवशी तिला अटक झाली आणि तिने शरद पवारांसंदर्भात पोस्ट लिहिली त्या दिवशीच्या परिस्थितीबद्दल भाष्य केलंय.
आरोग्य केंद्रावर केतकीला न्यायलयीन कोठडीत नेण्याआधी तपासणीसाठी आणलं असता तेथे उपस्थित असणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी तिला पवारांसंदर्भातील पोस्ट केली त्या दिवसाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना केतकीने त्या दिवशी सर्वांचाच बीपी (रक्तदाब) वाढला होता, असं उत्तर हसत हसत दिलं. काही मिनिटं ती आरोग्य तपासणीसाठी या आरोग्य केंद्रावरील बूथवर बसली होती. त्यावेळेसही ती हसत हसत वेगवेगळ्या विषयांवर बोलत होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी केतकीची खासगी माहिती आरोग्य केंद्रात नोंदवण्यात आलेल्या वहीच्या पानाचा फोटो काढल्याबद्दल तिने आक्षेपही घेतला.
पवारांबद्दल पोस्ट केली त्या दिवसाबद्दल बोलताना केतकीने, “त्या दिवशी बीपी चेक केलं असतं तर सगळ्यांचं २०० च्या वर शूटअप झालं असतं,” असं म्हटलं. त्यानंतर ती आपली प्रकृती सामान्य असल्याचं आरोग्य तपासणी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला सांगत होती. तसेच हातावरील रॅशेस हे डस्ट अॅलर्जी असल्याने आलेत, असंही केतकी म्हणताना या व्हिडीओत दिसत आहे.
त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी केतकीची खासगी माहिती नोंदवण्यात आलेल्या बुकलेटचा फोटो काढल्यानंतर तिने यासंदर्भात सोबत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला सांगितलं. “त्यांनी माझ्या पत्त्याची माहितीही शूट केलीय. त्यांनी ऑलरेडी माहितीय मी कुठे राहते. पण किमान ते प्रकाशित तरी करु नका,” असं केतकी हसत हसत माध्यम प्रतिनिधिंना म्हणाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुनावणी पूर्ण झाली असून २६ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Leave a Reply