बॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक

नागपूर : २५ मे – बिहार येथील भागलपूर कोर्टात पेशीवेळी पोलिसांना चकमा देत बॉम्बस्फोटातील आरोपी पळाला होता. मो. तनवीर मो. मंजूर (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. या आरोपीचा शोध सुरू असताना हा आरोपी नागपूर शहरात सापडला. तहसील पोलिसांनी त्याला अटक केली. अटकेवेळी आरोपीकडून देशी कट्टा, दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. १७ मे २0२२ रोजी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते.
आरोपी तनवीर हा न्यायालय परिसरातून पोलिसांना चकमा देत पळाल्यानंतर तो थेट कोलकाता येथे गेला. येथून तो नागपूर शहरात आला आणि शबीना खान यांच्या घरी राहत होता. या प्रकरणी तहसील पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याची आणि घराची तपासणी केली असता तो राहत असलेल्या खोलीतील बेडच्या उशीखाली एक देशी कट्टा मिळून आला. येथेच दोन जिवंत काडतूसही होते. आरोपीला अटक केल्यानंतर बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी तनवीर हा असानंदपूर, भागलपूर, बिहार येथील रहिवासी आहे. भानखेडा येथे तो एका महिलेसोबत राहत होता. ही महिला दुकानात काम करणार्या मजुरांना (नोकरांना) जेवण देण्याचे काम करीत होती. तर, तनवीर हा एका कपड्याच्या दुकानात ब्लेजर तयार करण्याचे काम करीत होता. तनवीरचे वडील मो. मंजूर यांची भागलपूर येथे हत्या करण्यात आली होती. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याकरिता २0१७ मध्ये त्याने त्याच्या वडिलांना मारणार्या आरोपींच्या घरावर देशी बॉम्बने हल्ला केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर कोलकाता आणि नागपूरला तो आला. दरम्यान, २0२१ मध्ये नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला अटक करीत त्याला भागलपूर पोलिसांच्या हवाली केले होते. तेव्हापासून तो तरुंगात होता.

Leave a Reply