न्यायव्यवस्थेने आणि केंद्राने आपल्या मर्यादेत राहावे – प्रकाश आंबेडकर

अमरावती : २२ मे – देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी जशा स्वरुपात हा देश मिळाला तसाच हा देश ठेवायला हवा. न्यायव्यवस्थेने सुद्धा ही बाब लक्षात ठेवायला हवी, असे वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर अमरावतीत म्हणाले.
400 वर्षांपूर्वी झालेल्या अतिक्रमणाचा आता विषय नको – खरेतर देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ज्या प्रमाणे या देशात मंदिर , मस्जिद किंवा कुठलीही इमारत होती ती तशीच पुढे जपून ठेवणे महत्त्वाचे आहे. चारशे वर्षांपूर्वी या ठिकाणी असे होते आणि आता तसे आहे, असे विषय सुरू करण्यात कुठलाही अर्थ नाही. असेच जर करायचे असेल तर उद्या जगाने आपल्याला अशोकाच्या काळात भारतात काय होते? असे विचारले तर अशोकाच्या काळात असणारा भारत आता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार का? चुकीच्या विषयांकडे समाजाला नेणे योग्य नाही, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. जुने वाद उकरून काढण्यासाठी केंद्र सरकार आणि न्याय व्यवस्था नाही. न्यायव्यवस्थेने आणि केंद्राने आपल्या मर्यादेत राहावे, असा इशारा देखील प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
ब्राम्हण विरोधी नाही हे सिद्ध करण्याचे पवारांचे प्रयत्न – राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ब्राह्मण समाजाच्या विरोधात वक्तव्य केले आणि यातच अभिनेत्री केतकी चितळेच्या प्रकरणाने भर टाकली. आता आपण ब्राह्मणविरोधी नाही हे सिद्ध करण्यासाठी शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाची बैठक बोलावली. या बैठकीवर काही जणांनी बहिष्कार का घातला? याचे उत्तर शरद पवारांनी द्यावे, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मर्यादेच्या बाहेर गेला तर अशांतता निर्माण होणार – केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्था या मर्यादेच्या बाहेर गेल्या तर या देशात अशांतता निर्माण होण्याची भीती प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. काश्मीरमधल्या साडे तीन जिल्ह्यांमध्ये 1980 पासून 2022 पर्यंत जे काही सुरू आहे त्यामुळे अख्ख्या देशात अशांतता निर्माण झाली आहे. गंभीर बाब म्हणजे देशाचे पाच लाख सैन्य काश्मीर आपल्या ताब्यात घेऊ शकले नाही. मोठ्या रशियाचे उदाहरण सर्वांसमोर आहे. यामुळे जुने वाद उकरून काढण्यात अर्थ नाही, आपल्याला देशात शांतता हवी आहे की अशांतता? याबाबत देशातील नागरिकांनी ठरवावे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Leave a Reply