बकुळीची फुलं : भाग ३१ – शुभांगी भडभडे

5 sep shubhangi bhadbhade

मुंबईहून यांबरोबर मी पुण्याला आले. मावस दीर होस्टेल मधे राहातं होते . हे शेवटचं वर्ष होतं . आणि तिथे यांचे लहान भाऊ सुधामामा राहात होते ते तबला सुंदर वाजवत होते . मला स्वतःला सारं खुप आवडायचं . पण मला मात्र गाणं , वाद्य वाजवणे येत नव्हतं . कसं शिकणार होते मी , विचार तरी कसा येणार होता ? परिस्थिती तशी नव्हतीच .
मुंबई ला मामी म्हणाल्या .
अगं तुझे साड्या आणि दागिने दाखव ना.
माझ्या घरून चारच साड्या घेतल्या आणि तेवढ्याच तर होत्या . आणि दागिने तर काहीच नव्हते . सासरकडूनच दोन बांगड्या , कानातलं आणि मंगळसूत्र अंगठी घातली होती. काय दाखवू यांना ? माझा चेहरा पडला असावा . ताई म्हणाल्या .
“माहेरी ठेवायला सांगितलं सारं , आम्ही दोघी प्रवास करणार , जबाबदारी नको होती”
सर्वांना ते पटलं होतं. पुण्याला घर साधं त्याहून माणसं साधी , काही विचारलं नाही . उलट बाहेर निघतांना मामा म्हणायचे
” सांग सूनबाई , तुझ्या आवडीची भाजी , आणतो मी . ” भाजीसह ते कै-या आणायचे . गजरा आणायचे . एकदा तर माझ्या दोन लेण्यांना मी बांधत होते तशा रंगीबेरंगी रिबिनी आणल्या . मामी हसून म्हणाल्या,
” कमाल आहे तुमची, कधी असं काही सांगूनही आणलं नाही , आता अगदी नसांगता आणता , काही म्हण शैला, तुझ्या पायगुणाने बघ कसा फरक पडला तुझ्या सास-यात . “
” नवी सून आली तर तुला एवढा उत्साह आला की अगदी ताटभर पदार्थ करतेस त्या सूनेसाठी. आम्हालाही मिळतात म्हणा. “
दीर ही तिथेच आले आणि सारं पुणे शहर पाहिलं . खरंच खूप मजा येत होती .
रात्री मात्र वाटायचं , ” त्यांच्यामुळेच हे सारे संबंध , ताई , दीर , मामे सासरे मामे सासू बाई , मावस सासूबाई . खुप मावस चुलत , मामे भाऊ , हे यांच्या मुळे होतं . तसं कधी संपेल हे युद्ध , आणि कधी येतील ते परत , कमीत मी सुखरूप आहे असं तर पत्र यायला हवं होतं पण येत नव्हतं. पूर्वी आजच्यासारखं युद्धही पाहू शकू असे टीव्ही ही नव्हते .कळायचं पत्र तार किंवा कुणी कुठून परतला तर त्यांच्या बरोबर निरोप यायचा . आता तेही शक्य नव्हतं.
पुण्याहून देहू , आळंदी , अगदी पंढरपूर ला ही गेलो . मी गुंतलेली असावी , अशी त्यांची इच्छा असावी. खुप सारं पाहूनही मलकापूरला आलो तेव्हा हे महिना संपत होता. . १५ मार्च ला लग्न झालं आता हे महिना संपत आला होता तरीही अगदी गेल्या गेल्या त्यांनी पाठवलेलं चार ओळींचं पत्र फक्त मिथ्या मनात पाठ होतं , पेटीत जपून ठेवलं होतं.
पुण्यातून निघतांना माझे मावस दीर म्हणाले ,
“वहिनी, आठ दहा दिवस तू मलकापूर ला रहा , मग मी तुला नागपूरला घेऊन जाईन”
मी राहिले खरी पण मनच लागत नव्हतं . ताई आणि मी , करणार काय ? बोलावं काय ?, कडक उन्हात जाणार तरी कुठे ? मी एकटीच गच्चीत कशी झोपणार ?
आणि घरी एकच एक टेबल फॅन फक्त .
कसे दिवस गेलेत आठवून ही मनाचा थरकाप होतो .
म्हटल्याप्रमाणे दीर आले . मलाही वाटत होतंच पण बोलणार कशी .
त्यांच्या बरोबर नागपूरला आले . चार दिवस राहून परत जाताना म्हणाले.
” वहिनी , जीवनात मनात कसलेही विचार आणायचे नाही. आणि सैनिकांच्या पत्नीचं मन इतकं दृढ असावं की….. ” ते बरंच बोलले . . बोलणं सहज होतं .मला धीर देणारं होतं. पण मनात शंका कुशंका होत्याच त्या कुठे जाणार होत्या ?
में महिना संपला. नागपूरला आल्यावर टिळकपुतळ्याजवळ येणा-या एक्स्प्रेस डिलीव्हरी व्हॅन मधे दर आठ दिवसांनी पत्र नियमित लिहीत होते .
दादा म्हणाले
” पुन्हा नोकरीसाठी प्रयत्न कर ” मी म्हटलं
मी आता माझ्या वनिता विकास विद्यालयात नोकरी करणार नाही . , मी प्रयत्न करते “
म्हटलं खरं पण कुठेही मी प्रयत्न केला नव्हता .
घरचं वातावरण आता निराशेच्या अंधारात झाकोळून गेलं होतं.
आणि वाट पहाताना सप्टेंबर उजाडला आणि अचानक ह्यांचं पत्र आलं . तेही पोस्टकार्ड .
“येण्याचं इतक्यात सांगत नाही. पण आता मी सुखरूप आहे . पत्र लिहीन . “
आनंदाला पारावार नव्हता . आश्चर्य हे होतं की , ज्यांच्याशी लग्न होऊन केवळ दहा दिवस सहवास लाभला होता त्यातले चार दिवस नागपूर मलकापूर जाण्यात , एक दिवस लग्नाचा होता , आणि त्यांच्यासाठी मी सहा महिने रात्रंदिवस शुभ चिंतीत होते . ह्या लग्नाच्या गाठी आकाशात ला देव जुळवतो असं म्हणतात .
असं असेल तर आता जी लग्न होतात त्या लग्नाच्या गाठी देव पक्क्या बांधत नाही का ?
आता पुढे………

शुभांगी भडभडे नागपूर

Leave a Reply