तरुणीचे अपहरण करून विक्री करणारे ४ आरोपी अटकेत

नागपूर : ९ मे – कॅटरिंगच्या कामाला जाण्याचा बहाणा करीत एका तरुणीचे अपहरण करून तिची १ लाख ७० हजारात उज्जैन (म.प्र.) येेथे विक्री करणार्या दोन महिलांसह चौघांना बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. कुणाल अरूण ढेपे (37) गणेशनगर, कोतवाली, विभा अनिल वरदेकर (40) गल्ली नं. 2 महाल, मुस्कान मोहबुद्दीन शेख (31) नवीन फुटाळा आणि भरत रघुनाथ सोळंकी (24) खापतखेडी, उज्जैन (म.प्र.) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पीडित 22 वर्षीय तरुणी ही अजनी हद्दीत रामेश्वरी येथे राहते. तिचे लग्न झाले असून तिला 4 वर्षांची मुलगी आहे. काही महिन्यांपूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाला. उदरनिर्वाह करण्यासाठी ती कॅटरिंगच्या कामाला जात होती. या मजबुरीचा फायदा आरोपी कुणाल, विभा आणि मुस्कान यांनी घेतला. बाहेरगावी ईव्हेंटचे काम आहे असे पीडित तरुणीला सांगून 19 एप्रिल रोजी सोबत नेले. मुलीला आईच्या घरी सोडून ती आरोपींसोबत निघून गेली. तरुणीला घेऊन आरोपी उज्जैन येथे गेले. तेथे भरत सोळंकी यास 1 लाख 70 हजारात तिला विकले. त्याचप्रमाणे तिच्यावर जोरजबरदस्ती करून आणि दबाव आणून भरतसोबत तिचे लग्न लावून दिले. भरतकडून पैसे घेऊन आरोपी नागपूरला निघून गेले. तिकडे लग्न केल्यानंतर तरुणी पळून जाऊ नये म्हणून भरतने तिला बंदिस्त केले होते.
इकडे दहा, बारा दिवस होऊन तरुणी घरी न आल्याने तिच्या आईला काळजी लागली. तिने मुलीच्या मोबाईलवर संपर्क केला असता मोबाईल बंद येत होता. काहीतरी गडबड आहे हे समजून मुलीच्या आईने बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी 366 अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
पोलिसांनी तरुणीचा मोबाईल ट्रॅकिंगवर ठेवला असता दोन दिवसांपूर्वी तिचे लोकेशन उज्जैनला आले होते. त्यामुळे काल रात्री बेलतरोडीचे वपोनि विजयकुमार आकोत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास मनपिया, हे. कॉ. शैलेश बडोदेकर, शिपाई बजरंग जुनघरे, गोपाल देशमुख आणि पीडित तरुणीचा भाऊ हे उज्जैनला रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने बेलतरोडी पोलिसांनी तरुणी आणि भरतला ताब्यात घेतले. भरतची विचारपूस केली असता त्याने तरुणीला खरेदी केल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे इतर आरोपींची नावे सांगितली. ही माहिती उपनिरीक्षक मनपिया यांनी वपोनि अकोत यांना दिली. काल रात्रीच अकोत यांनी तपासचक्रे फिरवून कुणाल, विभा आणि मुस्कान यांना ताब्यात घेतले. त्यानंतर शनिवारी तरुणी आणि भरतला घेऊन पोलिस पथक उज्जैनहून नागपूरला परत आले. पोलिसांनी चौघांनाही अटक केली.

Leave a Reply