महागाई वर कुणी बोलत नाही हे घातक – आ. किशोर जोगरेवार

नागपूर : १७ मे – सध्या राज्यात राजकीय सभेला सभेतून उत्तर देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. हा प्रयोग पक्ष हिताचा असू शकतो, मात्र तो समाज हिताचा नक्कीच नाही. राज्यात सतत सुरू असलेल्या सभांमुळे राज्यातील सर्व सामान्य लोकांचे प्रश्न बाजूला सारले जात आहेत, महागाई वर कोणी बोलत नाही हे घातक असल्याची टिका चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली.
आमदार जोरगेवार म्हणाले, पोलीस प्रशासनावर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. समाजा-समाजांत तेढ निर्माण होत आहे. या राजकीय सभांमधून नेते केवळ एकमेकांना ललकारत आहे. परिणामी दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शत्रुत्व निर्माण होत आहे. त्यामुळे अशा राजकीय सभा केवळ निवडणुकांपुरती मर्यादित ठेवाव्या आणि समाज हिताच्या प्रश्नांकडे अधिक प्रखरतेने लक्ष देत समाजाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी आपल्याला पूर्ण करायची असल्याचे आहे. ‘बंद करो ललकारी, पुरी करणी है जिम्मेदारी’, असे म्हणत त्यांनी टिका केली आहे

सभांमध्ये होणारी गर्दी यापूर्वी राज्याने पाहिली आहे. मात्र सध्या सभा घेण्यासाठी सुरू असलेली राजकीय पक्षांची गर्दी निवडणुकांव्यतिरिक्त झाल्याचा इतिहास नाही. हिंदू ह्यदयसम्राट , शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, शरद पवार, प्रमोद महाजन यांच्या सभांना होणारी गर्दीही राज्याने पाहिली आहे. मात्र या सभांना जाणारा हा सर्व सामान्य नागरिक असायचा. सभेतून बाहेर निघाल्यावर तो हक्कांप्रति जागृत होऊन निघायचा. मात्र आज सुरू असलेल्या संभामध्ये जाणारा ८५ टक्के वर्ग हा त्या-त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या सभांचा समाजाला उपयोग नाही. नव्याने सुरू झालेला हा प्रकार थांबला नाही तर तो भविष्यातला मोठा धोका ठरू शकतो, यातून राज्यातील महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित होणार नाही, असे आमदार जोरगेवार म्हणाले

अशा सभांमधून होणारे वक्तव्य शांतीप्रिय असलेल्या राज्यातील समाजा समाजामध्ये वैर निर्माण करेल आणि हे राज्यहितासाठी घातक ठरेल. या सभांमध्ये गर्दी वाढविण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांना एकत्रित केल्या जात आहे. याचा परिणाम रुग्णवाहिका व महत्वाच्या वाहतूक व्यवस्थेवरही जाणवत आहे. पोलीस प्रशासनावरती ताण निर्माण होत आहे. राज्याला पेलवणारा नाही असे जोगेवार म्हणाले.

Leave a Reply