बकुळीची फुलं : भाग ३० – शुभांगी भडभडे

5 sep shubhangi bhadbhade

सासूबाई आणि मी मलकापूरला आलो . दोन दिवसांनी निघालो मुंबईला . पूर्वी लग्न झाल्या झाल्या कुलदेवतेच्या दर्शनाला दोघांनी जाण्याची प्रथा होती . त्यामागचा उद्देश दोघांनी एकमेकांना समजून घेण्याचा होता .
आज आम्ही दोघी एकमेकींना समजून घेण्यासाठी निघालो होतो. विलक्षण योगायोग होता .
त्या एकदम गो-या त्यावेळी जरा आधुनिक . नऊवारी नेसायच्या पण अगदी नीटनेटकं, हाताला घड्याळ होतं , डोळ्यांवर काळा चष्मा उन्हासाठी . पूर्वीच्या घरंदाज स्रिया दिसायच्या तशा त्या दिसत होत्या . मला संकोच वाटत होता. त्या मोकळ्या मनाने बोलत होत्या , त्यांच्या दोन भावांबद्दल , तीन बहिणी बद्दल . मधेच त्यांनी विचारलं
” तुझे काका मामा आले होते लग्नात ?
“मला तीन सख्खे मामा आहेत .पण कधी नागपूरला आले नाहीत . खुप श्रीमंत आणि खुप शिकलेले आहेत. इथे विरार,
शिरवळला, पुण्याला असतात . कधीमधी मधल्या मामाचं पत्र येतं .
“आणि काका? त्यांनी उत्सुकतेने विचारलं.
“माझ्या वडिलांना फडणवीस घराण्यात माझ्या आजीने दत्तक घेतलं होतं . दादा मूळचे पुण्याचे . पण नागपूरला दत्तक गेले. त्यामुळे सख्खे काका नाही तर , आत्या

नाही . बाकी सारे आजीकडून सारे आहेत .”
लग्नापूर्वी त्यांनी कुठलेही प्रश्न विचारले नव्हते . पत्रिका ही पाहिली नव्हती .त्या म्हणाल्या होत्या सासूला सून पसंत तर पत्रिकेची गरजच नाही .”
मलकापूर ला चार दिवस त्यांच्या ओळखीच्या घरी जाण्यात गेले पण “ह्यांच्या” समोर मी डावी आहे हेच मला ऐकायला मिळालं . आणि ते सत्य मला स्वतःला ही कळलं होतंच , स्विकारलंही होतं पण ऐकताना लोकांनी असं खरंखुरं सांगू नये असं वाटत होतं.
पण सासूबाई म्हणत होत्या
“गुणी सून मिळाली . फार मोठं भाग्य आहे मुकुंदाचं.” त्या मला सावरून घेत होत्या .
इथे घरी पेपर येत नसल्याने शेजारच्या घरी जावं लागतं होतं . सासूबाई च पेपर आणत होत्या . मी दारातच उभी होते . शेजारीण म्हणाली
“काही म्हणा ताई , ही आली आणि त्याच वेळी टांगा एकांत एक अडकला , आता बघा लढाई वर गेलाय तुमचा लेख . ही काही चांगली लक्षणं नाहीत.”
सासूबाई म्हणाल्या .
फांदीवर बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडली तर दोष कुणाला द्यायचा ? ती तर नविन आहे . तिला का दोष द्यायचा ? होईल सारं ठीक. “
माझे डोळे भरून आले होते. दोन दिवसांनी आम्ही मुंबईला निघालो.
माझ्याकडे चार साड्या लग्नातल्या दोन घरात नेसायच्या होतंच काय असं पेटी भरावी असं . सासूबाई त्यांना सारेच ताई म्हणत . मीही ताई म्हणण्याचा सराव केला .
ताईंची पेटी कपड्यांनी खचाखच भरून दोन पिशव्या होत्या, कपड्यांच्या. खाण्याच्या पदार्थाची एक पिशवी . भाडेकरी खुप चांगली माणसं होती . त्यांनीच टांगा आणला , स्टेशनवर पोहोचवायला आले .
” ताई सांभाळून जा , काही लागलं तर कळवा ” म्हणाले .
आमची गाडी सुटेपर्यंत ते थांबले होते. गाडी सुटली . रात्री झोपण्यासाठी चादरीची वळकटी होतीच . तेही एक सामानच .
रात्री गाडीच्या लयीत अगदी शांत झोप लागली . दहाच्या सुमारास गाडी दादरला पोहचणार होती .
चौथी झाल्यावर मी डोंबिवलीहून नागपूरला आले होते आता नागपूर , मलकापूर करून मुंबई ला जात होते. तेव्हाची कुतुहल आत्ताही होतं. ताई म्हणाल्या
तोंड धुवून घे त्यांनी पेस्ट माझ्या समोर धरली . आज पर्यंत कोळशाची वस्त्रगाळ पावडर नाहीतर चक्क राखेनी दात घासत होतो .
मलकापूरला येतांना मी माझं बिटको दंत मंजन आणलं होतं आत्ताही ते पेटीत होतं. पण त्यांनी पेस्ट काढून दिल्यावर मी काही बोलले नाही . बोटांनी बेसिन वर जाऊन दात घासले आणि सवयीने पदराने तोंड पुसले .
ताईंनी हातात नॅपकीन देत म्हटलं ही पेस्ट आणि नॅपकीन असू दे तुझ्याजवळ मी तुझ्यासाठी आणलंय हे सारं. ” मी पेटीत सारं ठेवलं . पर्स तर नव्हतीच शाळेत जात होते तरीही.
एक क्रोशाने विणलेली रंगीबेरंगी पिशवी होती. आजही ती पेटीत होती , ताईंजवळ एक मोठी पर्स होती . त्यांनी ती मला सांभाळायला सांगितली होती.
चहा झाला . खाली शंकरपाळी घरून आणली होती . ती खाल्ली. तेवढ्यात गाडी सिग्नलवर थांबली आणि दोन माणसं आमच्या समोर येऊन बसली . एकाच्या हातात कंठीचे मण्याचं जाडजूड मंगळ सूत्र होतं . दुस-याने विचारलं , कुठे मिळालं ? पहिला म्हणाला ” पळवलं , हिसकलं , ठाण्याच्या स्टेशनवर .
आमचं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे जाताच ते पटकन् किंचित सुरू झाल्यावर गाडीतून उतरून गेलेही . ताई डब्याच्या दाराजवळ जाईपर्यंत गाडीने वेग घेतला आणि ते दोघं दिसेनासे झाले .
आम्ही दादरला पोहचलो . ते दोघं कुठे दिसतात का पहात होतो . पण गर्दीत ते मिसळले किंवा उतरल्यावर दुस-या गाडीत चढले असावेत.
आम्ही टॅक्सी केली आणि घरी पोहचलो . तरी मामे सासूबाई आल्या नव्हत्या . मामा म्हणाले ” ती आज लवकरच येणार होती”
मामेसासूबाई ठाण्याला हॉस्पिटलमध्ये नर्स होत्या .
जरा उशीरा आल्या आणि रडायला लागल्या , ठाणे स्टेशन वर मी हातानी मंगळसूत्र नेहमी प्रमाणे हातात धरूनच लोकलमध्ये चढले तरीही ते कुणीतरी खेचलं . इतकी वर्ष जातेय , येतेय पण असं कधी घडलं नव्हतं “
आता त्यांचं लक्ष आमच्याकडे विशेषत: माझ्याकडे गेलं . त्या शब्दही बोलल्या नाहीत , पण मनात मला ऐकू आलं ,” तू अपशकुनी आहेस”
त्या स्वतः ला सावरत म्हणाल्या ,
” शैला , तुझीच वाट पहात होते. बघ तुझ्यासाठी मोठ्ठा अबोली मोग-याचा गजरा आणलाय. “
त्यांनी पर्समधून काढून मला दिला. पण मन “अपशकुनी” शब्दातून बाहेर येत नव्हतं.
आता पुढे……

शुभांगी भडभडे नागपूर

Leave a Reply