विहिरीत कार कोसळून चार जणांचा मृत्यू

नाशिक : ८ मे – सटाणा रोडवर विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सटाणा येथील रहिवाशी शंकर यादवराव बोडके हे कारने (क्र. एमएच ०२, १७४०) मधून बळसाने (दुसाने) ता. साक्री येथून लग्नानिमित्ताने दुपारी दिघावे (ता.साक्री) येथे लग्नाला जात होते. त्यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार दिघावे फाट्यावरील एका विहिरीत पडली. या घटनेत बोडके कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला
कार चालवत असणारे शंकर बोडके (रा. सटाणा) हे कारमधून सुखरूप बाहेर पडले. परंतु त्यांची पत्नी गौरी बोडके (वय ३५), मुलगी श्रद्धा (वय १५), मुलगा तन्मय (वय १२) व दिघावे येथील नात्यातील युवती भूमिका योगेश पानपाटील (वय १२) हे पाण्यातच मृत झाले. चालक शंकर बोडके घडलेल्या प्रसंगाने इतके घाबरले होते, की त्यांना एक तास काहीच सुचले नाही, एका ठिकाणी बसून केवळ पाहत राहिले.
कासारे येथे घटना कळताच सरपंच विशाल देसले, पोलीस पाटील दिपक काकूस्ते, मनसेचे धिरज देसले, ग्रामपंचायत सदस्य बाळा खैरनार, जितेंद्र देसले यासह तरुण तात्काळ मदतीसाठी धावले. मदतकार्यासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करत अवघ्या काही वेळातच मदतकार्य केल्यामुळे शंकर बोडके यांना वाचविण्यात यश आले. इतर कुटुंबीय मात्र मृत झाले.
साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने विहिरीतून तरुणांच्या मदतीने कार बाहेर काढली. घटनास्थळी एडिशनल एसपी. बच्छाव, एपीआय बनसोडे यांनी भेट दिली. कासारे बिट हवालदार अशोक पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला. रात्री उशिरा विहिरीतून मृतदेह काढण्यात आले.

Leave a Reply