कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या संपूर्ण परिवाराने केली आत्महत्या

द्वारका : ८ मे – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात तैमान घातले आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. कुटुंबातील कमावणारा कर्ता पुरुष गेल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. मात्र, आता एक धक्कादायक घटना गुजरात मधून समोर आली आहे. कोरोनामुळे एका व्यक्तीचं निधन झाल्याने त्याच्या संपूर्ण कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
रिपोर्ट्सनुसार, गुजरातमधील द्वारका शहरात शुक्रवारी कोविड-19 बाधित एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची वयोवृद्ध पत्नी आणि दोन मुलांसह कथितपणे आत्महत्या केली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
वृत्तानुसार, पोलीस निरीक्षक पी. बी. गढवी यांनी सांगितले की, साधनाबेन जैन आणि त्यांची दोन मुले (कमलेश आणि दुर्गेश) यांचे मृतदेह द्वारका शहरात राहत असलेल्या भाड्याच्या घरात आढळून आले. कुटुंबाचे प्रमुख जयेशभाई यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि त्यानंतर या तिघांनी कीटकनाशक सेवन करुन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
द्वारका येथे घडलेल्या या घटनेने सर्वांनाच अचंबित केलं आहे. कोरोनाच्या या काळात परिस्थिती आधीच बिकट बनली असताना एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याच्या वृत्ताने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
असं म्हटलं जात आहे की, जयेशभाई यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत होतं. त्यातच जयेशभाई यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर या कुटुंबाला मोठा धक्का बसला, मग त्यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा.

Leave a Reply