पंतप्रधानांनी केले महाराष्ट्राचे कौतुक

मुंबई : ८ मे – महाराष्ट्रासमोर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. राज्य सरकार कोरोनावर मात करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी महाराष्ट्र चांगली लढाई लढत आहे’ अशा शब्दांत कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्र्यत्नांबद्धल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्रयाकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली तसंच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असं सांगितलं.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे, अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत, त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले.
पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
तसंच, राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी तात्काळ लसींचा पुरवठा करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत ऑक्सिजनची कमतरता आजही जाणवत आहे. त्यासाठी इतर राज्यांतून ऑक्सिजनचा पुरवठा तात्काळ राज्याला मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्याचबरोबर राज्याला विदेशातून लस आयात करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

Leave a Reply