मंत्रालय परिसरात कुटुंबातील दोन महिलांसह एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : १२ मे – हिंगोली जिल्ह्यातील एका व्यक्तीने कुटुंबातील दोन महिलांसह मंत्रालय परिसरात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. बांधकाम विभागातील कर्मचारी त्रास देत असल्यामुळे आम्ही हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं सदर व्यक्तीने सांगितलं. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तिघांचेही प्राण वाचले आहेत.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने हंबरडा फोडत आपली व्यथा मांडली. ‘मी कर्ज घेऊन एका रस्त्याचं काम पूर्ण केलं. या कामासाठी मला शासनाकडून १ कोटी ७० लाख रुपये मिळणे अपेक्षित असताना कसलीही रक्कम दिली जात नाही. याबाबत मी मंत्री अशोक चव्हाण यांचीही भेट घेतली होती. मात्र बांधकाम विभागातील कर्मचारी दखल घेत नाहीत, त्यामुळे माझ्यासमोर आत्महत्या हाच पर्याय आहे,’ असा आरोप सदर व्यक्तीने केला आहे.
मी भटक्या समाजातील असल्यानेच माझ्यावर अन्याय होत असल्याचा दावाही आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने केला.
दरम्यान, राजधानी मुंबईत मंत्रालयाजवळच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता. पोलिसांकडून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींची समजूत काढण्यात येत आहे.

Leave a Reply