माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम शर्मा यांचे निधन

नवी दिल्ली : ११ मे – माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम शर्मा यांचे आज निधन झाले. पंडित सुखराम हे घोटाळ्यामुळे चर्चेत राहिले होते. मात्र, भारतात मोबाइल क्रांतीचा पाया रचण्याचे काम पंडित सुखराम यांनी केले होते. भारतात सध्या किमान प्रत्येक घरात एक तरी मोबाइलधारक दिसतो. याचे श्रेय पंडित सुखराम यांना जाते. भारतात पहिला मोबाइल कॉलदेखील त्यांनी केला होता.
माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम हे 94 वर्षांचे होते. त्यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासूनच त्यांची प्रकृती नाजूक होती. वर्ष 1996 मध्ये पंडित सुखराम यांच्या घरी सीबीआयने धाड टाकत जवळपास चार कोटींची रोकड जमा केली होती. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले.
पंडित सुखराम हे 1993 ते 1996 या काळात दूरसंचार मंत्री होते. भारतात 31 जुलै 1995 रोजी पहिल्यांदा मोबाइल फोनमधून कॉल करण्यात आला होता. हा पहिला मोबाइल कॉल तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या दरम्यान झाला होता. यासाठी नोकिया कंपनीचा हँडसेट वापरण्यात आला होता. त्यानंतर भारतात टेलिकॉम क्षेत्र विस्तार गेले.

Leave a Reply