इतिहास संशोधन/लेखनातील काही चकवे – ॲड.लखनसिंह कटरे

असे म्हणतात की, इतिहास आणि विज्ञान या विषयांत अंतिम सत्य असे काहीच नसते, तर या विषयांद्वारे अंतिम सत्याच्या शोधाची प्रक्रिया सतत/कायमस्वरूपी सुरू असते. म्हणूनच इतिहास आणि विज्ञानाने संशोधित/प्रतिपादित केलेले तथ्य व कथ्य कालांतराने बदलत/सुधारित होत असते, ही आपली नित्याचीच अभ्यासप्रक्रिया आहे. अशा या वस्तुस्थितीच्या प्रकाशात इतिहास संशोधन/लेखनात उद्भवू शकणारे/उद्भवणारे काही चकवे जाणून घेणे महत्वपूर्ण ठरेल, असे मला वाटते. 
थुसिडायडसचा सापळा : ग्रीक इतिहासकार थुसिडायडस याच्या तद्विषयक विचारात या चकव्याची/सापळ्याची मांडणी आढळून येते. इतिहासाच्या संशोधन/लेखनात संबंधित संशोधक/इतिहासकार यांच्याकडून, कदाचित त्यांच्याही अजाणता, काही प्रमाद घडतात/घडू शकतात. आणि अशा प्रमादांच्या वशीभूत होऊन तशा संशोधक/इतिहासकारांकडून भ्रामक व/वा चुकीची मांडणी केली जाते. अशी मांडणी ही ज्या सापळ्यात सापडली/फसली असते त्या सापळ्यालाच थुसिडायडसचा सापळा अशी संज्ञा दिली जाते. कोणतीही घटना घडून गेल्यावर तिच्याविषयी तथ्यात्मक संशोधन करताना तत्कालीन परिस्थितीचे वास्तव, त्या परिस्थितीवर प्रभाव टाकणारे इतर तत्कालीन घटक, मानवी क्षमतेच्या आवाक्यातील तत्कालीन विचारप्रवाह/विचारप्रणाली, तत्कालीन सामाजिक व भौगोलिक वास्तव, अशा कितीतरी, सध्या कदाचित लुप्तप्राय झालेल्या, बाबींच्या प्रकाशात उपलब्ध साधनसामुग्री व डेटा या सर्वांचा साकल्याने व समग्रतेने विचार व अभ्यास करावा लागतो. अशा या व्यामिश्रतम वस्तुस्थितीची वास्तववादी उपपत्ती शोधून त्याबरहुकूम आपले संशोधन/लेखन सादर करताना काही महत्त्वपूर्ण बाबींकडे, कदाचित अजाणता, दुर्लक्ष होण्याची शक्यता ही थुसिडायडस सापळ्याची परिणती असू शकते. म्हणूनच इतिहास संशोधन/लेखनात अशा थुसिडायडस सापळ्याला, कदाचित अजाणता, शरण गेलेल्या शरणार्थी इतिहासकार/संशोधकांच्या संशोधन/लेखनाचे परिवर्धन होणे हे ऐतिहासिक संशोधनातील तथ्यात्मक बाबी शोधण्यासाठी परमावश्यक ठरत असते. आणि अर्थातच ही कायमस्वरूपी प्रक्रिया असते/असावी लागते.
ऐतिहासिक कोटी प्रमाद : इतिहास संशोधन/लेखनातच नव्हे तर इतरही विषयांच्या संशोधन/लेखनात बहुतेक वेळेस आढळून येणारे कोटी प्रमाद इतिहासाच्या वास्तववादी उपपत्तीला मारक/घातक ठरत असतात. असे कोटी प्रमाद घडण्यामागील कारणांचा आवाका सीमित असला तरी अशा कोटी प्रमादांमुळे ऐतिहासिक तथ्याकलन व निष्कर्ष हे भ्रामक/चुकीचे ठरण्याची दाट शक्यता असते. दोन (किंवा अधिकही) घटना/तथ्य(डेटा) यांची तुलना करताना घेतलेला आधारच जर पूर्वग्रह-मुक्त नसेल, कालातीत व कालाधारित नसेल, तुल्य-विसंगत असेल तर ती तुलना व त्याद्वारे प्रतिपादित निष्कर्ष ही बाब कोटी प्रमाद या संकल्पनेची/संज्ञेची शरणार्थी झालेली असते. आणि अशा कोटी प्रमादाने प्रभावित झालेले इतिहास संशोधन/लेखन सुद्धा भ्रामक तथा सत्योत्तर स्वरूपाचे ठरण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच इतिहास संशोधन/लेखनात इतिहासकार/संशोधकाने स्वतःला अशा कोटी प्रमादांचा शिकार/शरणार्थी होण्यापासून जाणीवपूर्वक जपले पाहिजे. कोटी प्रमाद ही संकल्पना/संज्ञा समजावून सांगत असताना पुष्कळदा एक उदाहरण दिले जाते. ते उदाहरण असे — “टीमसह खेळल्या जाणाऱ्या कोणत्याही खेळामध्ये जिंकण्याच्या दृष्टीने खेळाडूंमध्ये टीम स्पिरीट असणे आवश्यक असते. आणि जिंकलेल्या टीममधील एका खेळाडूने उत्कृष्ट टीम स्पिरीट चे प्रदर्शन केले.” या विधानांतील/कथनातील कोटी प्रमाद शोधता आला, तर कोटी प्रमाद ही संकल्पना/संज्ञा सहज समजू शकते. असो.
माझ्या अल्पबुद्धि-आकलनानुसार मी इतिहास संशोधन/लेखनातील दोन चकव्यांचे वरीलप्रमाणे संक्षिप्त टिपण जाणकारांच्या विचारार्थ व तदनुषंगिक मार्गदर्शनार्थ सादर करीत आहे.

ॲड.लखनसिंह कटरे

Leave a Reply