उत्तरप्रदेशमध्ये शासनाने धार्मिक स्थळांवरील १ लाख लाऊड स्पीकर उतरवले

नवी दिल्ली : ४ मे – महाराष्ट्रात मनसेच्यावतीनं मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसेनं आंदोलन सुरु केलं आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं १ लाख लाऊड स्पीकर उतरवले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात कोणत्याही वादाशिवाय शांततेत लाऊडस्पीकर उतरवल्याची माहिती मंगळवारी दिली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आमच्या सरकारनं या प्रकरणाला योग्यपणे हाताळल्याचं म्हटलं आहे. आमच्या राज्याती वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणांवरील १ लाख लाऊड स्पीकर्स उतरवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. एवढ्या मोठ्या संख्येनं लाऊड स्पीकर्स उतरवल्यानं राज्यातील गोंगाट कमी झाल्याचं ते म्हणाले. लाऊड स्पीकर उतरवण्यासंदर्भात आतापर्यंत कोणताही वाद झाला नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
योगी आदित्यनाथ यांनी या मुद्यावरुन स्वत: च्या सरकारचं कौतुक केलं आहे. आम्ही फक्त लाऊड स्पीकर नाही तर रस्त्यावर होणाऱ्या नमाज बद्दल देखील योग्य प्रकारे मार्ग काढला आहे. आम्ही रस्त्यावर नमाज पठण करता येणार नाही अशा सूचना दिल्या होत्या आता रस्त्यावर कोणीही नमाज पठण करत नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
उत्तर प्रदेशात २५ कोटी मुस्लीम वास्तव्यास आहेत. मात्र, रमजान ईदला कुठेही रस्त्यावर नमाज पठण झाल्याच समोर आलेलं नाही. आता लोक देखील पुढं येऊन सरकारी आदेशांचं पालन करत आहेत आणि रस्त्याऐवजी घरी किंवा मशिदींमध्ये नमाज पठण करतात, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
महाराष्ट्रात मनसेच्यावतीनं मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात देण्यात आलेला अल्टिमेटम संपला आहे. राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं होतं. राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांनी भोंगे उतरवून दाखवल्याबद्दल महाराष्ट्रात सगळे सत्तेचे भोगी असल्याची टीका केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिलेला अल्टिमेटम आज संपला असून राज्यात अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. मनसेच्यावतीनं काही ठिकाणी मशीदींबाहेर हनुमान चालिसा वाजवण्यात आली. तर, काही मशिदींनी आज लाऊड स्पीकरवर अजाण वाजवली नाही.

Leave a Reply