लग्न करून पैसे उकळणाऱ्या तरुणीला तिच्या साथीदारांसह अटक

नागपूर : ४ मे – लग्न करून एक दोन नव्हे तर पाच युवक तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडून पैसे उकळणारी ‘लुटेरी दुल्हन’ आणि तिच्या साथीदाराला जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे. मेघाली दिलीपराव तिजारे व तिचा साथीदार मयूर राजू मोटघरे, अशी अटकेतील ठगबाजांची नावे आहेत. महेंद्र रमेशलाल वनवानी (वय ३२, रा. हुडको कॉलनी, जरीपटका) याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
महेंद्र यांचा कळमना बाजारात फळ-भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. नोव्हेंबर २०२०मध्ये त्याची मेघालीसोबत ओळख झाली. माझा घटस्फोट झाला असून, मी वेगळी राहते, असे तिने महेंद्रला सांगितले. दोघे काही दिवस ‘लिव्ह इन’मध्ये राहिले. १५ सप्टेंबर २०२१ रोजी मेघाली ही महेंद्रच्या घरी गेली. लग्न न केल्यास अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्यानंतर महेंद्रने निवडक नातेवाइकांच्या उपस्थितीत मेघालीसोबत लग्न केले. लग्नाच्या १५ दिवसानंतर मेघालीने महेंद्रच्या नातेवाइकांसोबत वाद घालायला सुरुवात केली. त्यामुळे महेंद्र हे मेघालीसह वेगळे राहायला लागले. तिथेही तिने महेंद्रसोबत वाद घातल्यानंतर ती मानलेल्या भावाकडे राहायला गेली. त्यानंतर तिने महेंद्र व त्यांच्या नातेवाइकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार दिली.
जरीपटका पोलिसांनी महेंद्र व त्याच्या नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर महेंद्र व त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देऊन मेघालीने २ लाख उकळले. २ एप्रिल २०२२ला मेघालीने पुन्हा महेंद्र यांच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून महेंद्र यांना अटक केली. मेघालीने पुन्हा महेंद्रच्या कुंटुंबीयांना ५ लाख रुपयांची मागणी केली. मेघाली ही मयूर मोटघरे याच्यासोबत महेंद्र यांच्या घरी गेली. दागिने व अन्य साहित्य बळजबरीने घेऊन गेली. दोन दिवसांपूर्वी महेंद्रची जामिनावर सुटका झाली. महेंद्रने नातेवाइकांसह गुन्हेशाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांची भेट घेऊन तक्रार केली. पंडित यांनी जरीपटका पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून मेघाली व मयूरला अटक केली. दोघांची गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.
मेघालीने महेंद्रप्रमाणेच अन्य चौघांकडूनही गुन्हा दाखल करून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे. मेघालीने २००३मध्ये वर्धेतील कमलेश, पुलगावमधील नितीन, वर्धेतील सुरेश आणि अटकेतील मयूरकडूनही अशाचप्रकारे पैसे उकळल्याचे तपासादरम्यान समोर आले.

Leave a Reply