नागपुरात मनसे पदाधिकाऱ्यांवर पोलिसांची बारीक नजर

नागपूर : ४ मे – मशिदींवरील भोंगा उतरविण्यासाठी मनसेचे सर्वसर्वा राज ठाकरे यांनी ४ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून, कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास पोलिस सज्ज आहेत. पोलिसांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यादी तयार केली आहे. तसेच त्यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.
शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी स्थानिक पोलिसांशिवाय दोन हजार पोलिसांचा अतिरिक्त ताफा विविध ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणांवरील गस्त वाढविण्यात आली आहे. वेळ पडल्यास बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पोलिस अलर्ट मोडवर असून, पदाधिकाऱ्यांनाही कायदा हातात न घेण्याची विनंती करण्यात आली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करू, असे आश्वासन मनसे पदाधिकाऱ्यांनी दिल्याचेही आयुक्तांनी सांगितले. शहरात २९३ मशिदी, १२०४ मंदिरे आणि ४०० बुद्धविहार आहेत. शासनाच्या आदेशानंतरच या धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत निर्णय घेण्यात येईल. कोणालाही महाआरतीसाठी परवानगी देण्यात आलेली नाही व देण्यातही येणार आहे. भोग्यांबाबत शासनाच्या आदेशानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल.
शहरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना थेट कोठडीत डांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले आहे.

Leave a Reply